
रत्नागिरी शांत, संयमी जिल्हा; पोलिस विभागात काम करायले आवडते -अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई
रत्नागिरी ग्राहक पेठेच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा शांत व संयमी आहे. येथे महिलांचे सर्वांत जास्त प्रमाण आहे. या सर्व महिला काबाडकष्ट करणाऱ्या आहेत. महिला गृहिणी असली तरीही त्या हजारो रुपये वाचवत असतात. स्वयंपाक, मुले सांभाळणे, भांडी घासणे अशा सर्व कामांसाठी महिला ठेवल्यास त्यांना वेतन द्यावे लागते. त्यामुळे गृहिणी तेवढे पैसे कमवत आहेत. आई ही सर्वांत जास्त नियोजन, व्यवस्थापन करत असते. महिलांनी स्वतःला कधीही कमी समजू नये. प्रत्येक महिलेकडे काही ना काही कौशल्य असतेच, ते विकसित करावे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी केले.
रत्नागिरी ग्राहक पेठ आयोजित महिला दिनानिमित्त जे. के. फाईल्स येथील साई मंगल कार्यालयात आयोजित महिला बचत गट, उद्योगिनींनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, आज प्रदर्शनाला येऊन खूप आनंद झाला. कुठेही दोन महिला एकत्र आल्या की तिसरी महिला काय करते यावर चर्चा करतात. त्यापेक्षा सकारात्मक व विकासाच्या दृष्टीने विचार करावेत. प्रत्येकाला आयुष्यात वेळ सारखीच दिलेली आहे. कोणत्याही कामात दर्जा जपला की यश मिळते. महिलांसाठी पोलिस विभागातर्फे विविध उपक्रम राबवले जातात, या प्रदर्शनादरम्यान मार्गदर्शनही करण्यात येणार आहे, त्याचा लाभ घ्यावा.
या वेळी संजीवन चिकीत्सा मंदिरच्या प्रमुख उद्योजिका स्मिता परांजपे, हॉटेल व्यंकटेशच्या ममता नलावडे आणि ग्राहक पेठेच्या प्रमुख प्राची शिंदे उपस्थित होत्या. कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार प्राची शिंदे यांनी केला. या प्रसंगी उद्योजिका धनश्रीताई पालांडे यांचाही सन्मान अप्पर पोलिस अधीक्षक सौ. जयश्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.
स्मिता परांजपे म्हणाल्या की, कोरोना काळात व्यावसायिकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. आपण पदार्थ किंवा उत्पादन बनवू पण ते पोहोचवयाचे कसे असा प्रश्न होता. आज उद्योगिनींनी आपले घर सांभाळून कसरत करून व्यवसाय सुरू केला आहे. याप्रसंगी ममता नलावडे यांनी सर्व उद्योगिनींचे कौतुक केले. प्राची शिंदे या दरवर्षी असे प्रदर्शन भरवत असल्याबद्दलही अभिनंदन केले.
या प्रदर्शनात सुमारे ६० स्टॉल्स मांडले आहेत. यात कोकण मेवा, खाद्यपदार्थ, महिलांकरिता सौंदर्यप्रसाधने, साड्या, ड्रेस मटेरियल, ज्वेरली, हॅंडीक्राफ्ट प्रॉडक्टस, दर्जेदार मसाले यासह पाणीपुरी, भेळ, टेस्टी कोन, स्नॅक्सचे स्टॉल्सचा समावेस आहे. प्रदर्शन ८ मार्चपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८.३० या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले ठेवण्यात येणार आहे. प्रदर्शनाच्या कालावधी स्टॉल्सधारक महिलांसाठी पाककृती स्पर्धा, महिलांची मोफत नेत्रतपासणी, आरोग्यविषयक व्याख्याने, पोलिस विभागातर्फे महिला संरक्षणाविषयी मार्गदर्शन, केक बनवण्याचे प्रशिक्षण, फनी गेम्स, सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे बक्षीस वितरण आदींचे आयोजन केल्याची माहिती प्राची शिंदे यांनी दिली. अनघा निकम-मगदूम यांनी सूत्रसंचालन केले.
www.konkanroday.com