फरारे येथे डंपरखाली चिरडून चालकाचा मृत्यू
दापोली : तालुक्यातील फरारे भोईवाडानजीक एका उतारामध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने डबर टाकणारा डंपर झाडावर आदळला. यानंतर चालकाने उडी मारण्याचा प्रयत्न करत असताना अंगावरून डंपर जाऊन चालक मयत झाल्याची घटना दि.2 मार्च रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली. शरद पांडुरंग कापडी (वय 43, राहणार नाशिक) यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली. याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फरारे भोईवाडी येथे डबर (दगड) टाकण्याचे कंत्राट कापडी यांनी घेतले आहे. या कामावेळी चालक अलमगीर आत्मज सोबरतिमिया हुसेन (वय 27, राहणार आत्मज, भोजपूर-बिहार) हा चालक डंपर (क्रमांक एमएच 04, जीआर 4249) घेऊन एक वाजण्याच्या सुमारास डबर टाकण्यासाठी फरारी भोईवाडीकडे जात होता. एका उतारात त्याचे डंपरवरील नियंत्रण सुटले. डंपर झाडावर आदळला, यावेळी चालकाने उडी मारली. यावेळी तो डंपरखाली चिरडला. त्यानंतर चालकाला तत्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर तपासणीअंती डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. या घटनेची नोंद दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलिस करीत आहेत.