जीर्णोध्दाराच्या प्रतिक्षेत लोकमान्य टिळक जन्मभूमी…….
ॲड. धनंजय जगन्नाथ भावे…..9422052330
अलिकडेच लोकमान्य टिळकांचे नावाने असलेल्या शासकीय विभागीय ग्रंथालयाचे नूतनीकरणाचा/सुशोभिकरणाचा शुभारंभाचा कार्यक्रम पार पडल्याचे वृत्त वाचले. विपुल ग्रंथ सामुग्रीने युक्त अशा एक वास्तुचे नूतनीकरण/सुशोभिकरण होत आहे याचा वाचनसंस्कृतीच्या चाहत्याना आनंद होणे स्वाभाविक आहेच. त्याचे कौतुकही समाजमाध्यमांवर झाले आहे.
तस पाहायला गेले तर या विभागीय ग्रंथालयाला जनताभिमुख करण्याचे कार्य तत्कालीन प्रमुख श्री. प्रभाकर साठेसाहेब, ग्रंथालय चळवळीतील विद्यमान कार्यकर्ते आणि पूर्वाश्रमीचे या विभागीय ग्रंथालयाचे कर्मचारी श्री. श्रीकृष्ण साबणे यानी मेहनतीने केले. त्यांचेबरोबरचा कर्मचारी वर्ग विद्याधर जोशी, सिनकर, दाबके मॅडम, तांबोळी यांचेही मोठे सहयोगदान मिळाल्याने त्याचा विस्तारही रत्नागिरी, सिंधुदर्ग रायगड या जिल्ह्यांमध्ये चांगला झाला. एक चांगली संदर्भ देणारी संस्था म्हणून हे विभागीय ग्रंथालयाचे उपकेंद्र नावारूपाला आले यात शंकाच नाही. अलिकडे त्या वास्तुच्या नूतनीकरणाची आणि आधुनिकतेने सुशोभिकरणाची आवश्यकता निर्माण झाली असल्याने त्याकडे शासनाने लक्ष दिले याबद्दल समाधान वाटते.
पण या निमित्ताने शासनाचे आणखी एका उपेक्षित वास्तुकडे लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन !
ज्या लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सव सुरु केले त्या महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण तातडीने, लोकमान्यांचे नावाने सुरु झालेल्या शासकीय ग्रंथालयाच्या उपकेंद्राचे नूतनीकरणाचे/सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजनही थाटात झाले, परंतु रत्नागिरीमध्ये जे आग्रहाने पहाण्यासाठी पर्यटक येतात, आणि जे एका राष्ट्रपुरुषाचे मंदिर आहे त्या लोकमान्य टिळक जन्मभूमीच्या नूतनीकरणाकडे आजपर्यंत तरी अक्षम्य दुर्लक्ष का?
याविषयी वेळोवेळी पुरातत्व खात्याकडे निवेदने, वृत्तपत्रातून जनजागरण, सामाजिक संस्थांची निवेदने याकडे लक्ष देण्यास पुरातत्व खात्याला अजिबात वेळ नाही का? सुमारे गेली 5 वर्षाहून अधिक काळ लोकमान्य टिळक जन्मभूमीच्या नूतनीकरणासाठी विविध माध्यमातून शासनाकडे तक्रारी केल्या गेल्या आहेत. दरवर्षी टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी सकाळीच येथे उपस्थित राहून नित्यनेमाने एक कार्यक्रम करायचा म्हणून अभिवादन करतात. दुरुस्तीची एकादी घोषणा करतात आणि पुढील 1 ऑगस्ट पर्यंत ते विसरूनही जातात असा अनुभव आहे. सन 2021 च्या 1 ऑगस्टलाही अशी निधीसह घोषणा करण्यात आली त्याची माहिती शे-दीडशे वर्षे पार केलेल्या साप्ताहिकाच्या संपादक महोदयांनी स्वत: दिली आणि त्यानंतर लोकप्रतिनिधी आणि ते संपादकमहाशयही आता विसरून गेलेले दिसतात. असो आता आणखी एक घोषणा येत्या 1 ऑगस्टला ऐकायची का ?
कोरोनाचा कालावधी वगळता रत्नागिरीमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक हमखास टिळक जन्मभूमिला भेट दिल्याशिवाय जात नाही हे रत्नागिरीमधील नागरिक अनेक वर्षे पहात आहेत. पर्यटकही जन्मभूमीची दुरवस्था पाहून खेद व्यक्त करत असतात. पण दहा दहा वर्षे लोकप्रतिनिधी रहाणा-याना शहराचे प्रथम नागरिक रहाणा-यांना आणि कोणालाही टिळक जन्मभूमिच्या नूतनीकरणाविषयी काहीच कसे वाटत नाही याचे आश्चर्य वाटते. असो. आता आणखी एका घोषणेची वाट पहाण्याशिवाय कोणता बरे पर्याय आहे. संबंधिताना सुबुध्दी लाभो एवढीच प्रार्थना.