कोल्हापूर ते रत्नागिरी या महामार्गाच्या चौपदरीकरणातील दुसऱ्या टप्प्यासाठी दोन हजार १०४ कोटी खर्च करण्यास अर्थ समितीची मंजुरी
कोल्हापूर ते रत्नागिरी या महामार्गाच्या चौपदरीकरणातील दुसऱ्या टप्प्यासाठी दोन हजार १०४ कोटी खर्च करण्यास अर्थ समितीने आज मंजुरी दिली. आंबा घाट ते पैजारवाडी हा मार्ग दुसऱ्या टप्प्यात असून, त्यात जमीन संपादनापासून प्रत्यक्ष रस्त्याच्या कामासाठी यातील ९९३.३६ कोटी निधी तीन वर्षांत खर्च करावा लागणार आहे.ज्या प्रमाणात निधी खर्च होईल, त्या प्रमाणात तो केंद्र सरकारकडून वितरित केला जाणार आहे.
रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे केंद्रीय दळणवळण मंत्रालयाकडून चौपदरीकरण करण्यात येणार आहे. यातील तीन टप्पे कोल्हापूर जिल्ह्यातून जातात. जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी निविदा मागविल्या होत्या. त्यात तब्बल १८ कंपन्यांनी निविदा भरल्या असून, त्यांच्या तांत्रिक निविदा येत्या दोन दिवसांत उघडण्यात येणार आहेत. महिनाअखेरीस निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील जमीन संपादनाचे काम ९६ टक्के पूर्ण झाल्याने पहिल्यांदा या टप्प्यातील कामाला सुरुवात होईल.
दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाबाबत दिल्लीत ११ फेब्रुवारीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष व अर्थ कमिटीच्या अध्यक्षांसह सदस्यांची बैठक झाली. बैठकीत या कामासाठी किती निधी लागेल, याचा अंदाज बांधला होता. हायब्रीड ह्युमिनिटी तंत्रज्ञानाचा वापर करून हा रस्ता तयार करण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार या कामासाठी दोन हजार १०४ कोटींचा निधी खर्च करण्यास अर्थ समितीने काल (ता. २) मान्यता दिली. यासंदर्भात प्राधिकरणाचे सहायक कार्यकारी अभियंता रोहितकुमार राजपूत यांनी आज निधी वितरणाचे आदेश काढले.
आंबा ते पैजारवाडी या दुसऱ्या टप्प्यात ४२.५ किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ९९३.३६ कोटी मंजूर झाल्याची माहिती श्री. राजपूत यांनी आदेशात दिली. या निधीतून फक्त रस्त्याचे बांधकाम होईल. कोल्हापूर-रत्नागिरी ११२ किलोमीटर रस्त्यासाठी दोन हजार १०४ कोटी खर्च अपेक्षित आहे. या खर्चालाही अर्थ समितीने मंजुरी दिली.
www.konkantoday.com