कोकणच्या मच्छिमारांत खळबळ उडवणारा राज्याचा निर्णय

120 अश्‍वशक्तीवरील नौकांना डिझेल परतावा बंद; खासगी दराने विकत घ्यावे लागणार डिझेल, मच्छिमार संस्था डबघाईला

रत्नागिरी : राज्यात मासेमारी नौकांना मारक ठरणारा व खळबळ उडवणारा निर्णय घेण्यात आला आहे. मत्स्य व्यवसाय विकास प्रधान सचिव जगदीश गुप्ता यांच्या सहीने निघालेल्या आदेशात 120 अश्‍वशक्तीवरील नौकांना डिझेल परतावा वितरित करू नये, असे म्हटले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 280 अश्‍वशक्तीच्या बहुसंख्य नौका असल्याने नौका मालक अडचणीत आले आहेत. आता बाजारभावाने डिझेल खरेदी करावे लागणार असल्याने मच्छिमार सहकारी संस्थांना डिझेलसाठी ग्राहकच मिळणार नाहीत. त्यामुळे या सहकारी संस्थाही डबघाईला येणार आहेत. जिल्ह्यात 33 सहकारी संस्थांकडून नौकांचे डिझेल वितरण केले जाते. या निर्णयामुळे कोकणातील मच्छिमारांमध्ये खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 3 हजार 519 यांत्रिकी नौका आहेत. यातील बहुसंख्य नौका कोणत्या ना कोणत्या सहकारी संस्थांच्या सदस्य आहेत. या नौकांसाठी सहकारी संस्थांकडून डिझेल वितरित केले जाते. अनेक संस्था उधारीवर डिझेल देतात. त्याचबरोबर डिझेल खरेदीवरचा जो जीएसटी असतो तो डिझेल परताव्याच्या रुपाने नौका मालकाला परत मिळत असतो. परंतु आता ही सवलत प्रधान सचिवांच्या निर्देशानुसार बंद होण्याच्या मार्गावर आहे.

यापूर्वी आयुक्तांच्या निर्देशानुसार 198-280 अश्‍वशक्तीच्या नौकाना सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले होते. मात्र आता 120 अश्‍वशक्तीवरील नौकांना डिझेल परतावा वितरित करू नये. त्याचबरोबर सन 2022-23 च्या डिझेल कोट्यामध्ये 120 अश्‍वशक्तीवरील नौकांचा प्रस्तावांमध्ये समावेश करू नये. या निर्देशानुसार सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी सर्व मच्छिमार सहकारी सोसायट्यांना पाठवले आहे. त्यामुळे डिझेल विकणार्‍या संस्थांमध्ये नाराजी आहे.

महाराष्ट्र मच्छिमार विकास संघाचे अध्यक्ष अब्दुल बिजली खान यांनी सहकारी संस्थांच्या पदाधिकार्‍यांना संघटीत होण्याचे आवाहन केले आहे. सहकारी संस्थांनी संघटीत होऊन मंत्री अस्लम शेख यांची भेट घेणे अपेक्षित असल्याचे खान म्हणाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button