
भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण मार्फत श्री. नबाब मलिक या आरोपित मंत्र्यांना मंत्रिमंडळातून तात्काळ डच्चू द्यावा अशा मागणी करणारे पत्र देण्यात आले
नबाब मलिक यांचेवर ईडीचे माध्यमातून आरोप पत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर मेहेरबान न्यायालयाने त्यांना आठ दिवस कोठडीचा
आदेश केला. मलिक यांच्यावर असणारे आरोप हे अत्यंत गंभीर आहेत. देश विघातक कृत्य करणाऱ्या प्रवृत्ती, 1993 च्या बॉम्बस्फोटांमध्ये सहभागी असलेल्या देशद्रोही प्रवृत्ती बरोबर तसेच अंडरवर्ल्ड शी संबंधित असलेल्या व्यक्तींबरोबर मलिक यांचे संबंध आहेत. त्यांचे सोबत काही आर्थिक व्यवहार झालेले दिसतात अशा प्रकारचे गंभीर आरोप आहेत. एक प्रकारे देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हानदेणाऱ्या प्रवृत्ती बरोबर असलेले संबंध म्हणजे देशविघातक कृत्य ठरणारे आहे. आणि असे आरोप असणारे मंत्री मंत्रिमंडळात राहण्यासाठी पात्र नाहीत आपल्या देशाची आपल्या राज्याची परंपरा संकेत पाहिले असता अशा प्रकारचे आरोप असणारी व्यक्ती मंत्रिमंडळात राहणे हे पूर्णतः अयोग्य आहे. लोकशाही परंपरेला साजेसे नाही. देशद्रोहाचा सारखे आरोप ज्या ठिकाणी लावले गेले आहेत अशा मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देणे अभिप्रेत आहे. मात्र संबंधित व्यक्ती स्वतः राजीनामा देत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंत्रिमंडळातून अशा आरोपित मंत्र्याला डच्चू दिला पाहिजे. जनभावना लक्षात घेता व संसद विधिमंडळ यांची उज्वल परंपरा लक्षात घेऊन तात्काळ माननीय मुख्यमंत्री यांनी नबाब मलिक या आरोपित मंत्र्याला पदच्युत करावे अशी मागणी रत्नागिरी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. आज रत्नागिरी भाजपच्या माध्यमातून निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन श्री. नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे पाठवण्यासाठी सुपूर्त करण्यात आले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष दिपक पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस सचिन वहालकर तालुका अध्यक्ष मुन्ना चवडे, शहराध्यक्ष सचिन करमरकर, नगरसेवक राजेश तोडणकर, सुप्रिया रसाळ , सौ रायकर, सौ करमरकर यांचेसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.