
अधिवेशनाच्या नावाखाली दापोली आगारातील कर्मचारी निघाले पर्यटनाला
उग्र आंदोलनाचा ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसचा इशारा : ५ ते १० मे एसटी वाहतूक होणार विस्कळीत.
दापोली : ऐन उन्हाळ्याच्या हंगामात अधिवेशनाच्या नावाखाली तब्बल १३० कर्मचारी पाच दिवस पर्यटनाला जात असून यामुळे मुंबईकर चाकरमानी व ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत. दापोली आगारातील एकही फेरी पाच दिवसाच्या कालावधीत रद्द झाली, तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी दापोली आगार व्यवस्थापकांना दिला आहे.
दि. ५ व ६ मे रोजी माणगाव येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे ५७वे राज्यव्यापी महाअधिवेशन होणार असून या अधिवेशनाच्या नावाखाली दापोलीतील सुमारे १३० कर्मचारी हे गुजरात पर्यटनासाठी जात असून ५ ते १० मे या कालावधीत ते कर्मचारी रजेवर जाणार असल्याने दापोली आगाराचा संपूर्ण कारभार विस्कळीत होणार असून अनेक फेऱ्या रद्द होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर दापोलीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांच्या नेतृत्वाखाली, तर काँग्रेस पक्षाचे तालुका सरचिटणीस मंगेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली आगारप्रमुखांना भेटण्यासाठी गेले. ठाकरे सेनेचे जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, विधानसभा क्षेत्रप्रमुख मुजीब रूमाणे, शहरप्रमुख संदीप चव्हाण, काँग्रेसचे सुहास घटे, मेहबुब कोंडेकर, रूपेश मर्चंडे, रियाज तळघरकर, उमेश साटले, संतोष धोत्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी दापोली आगारातून अचानक १३० इतके कर्मचारी कसे अधिवेशनाला जात आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात कर्मचारी पाठवणे गरजेचे असून माणगांवला अधिवेशन असताना कर्मचारी गुजरातला कशासाठी जात आहेत. ते पण ऐन उन्हाळी हंगामात अशा प्रश्नांची सरबत्ती पदाधिकाऱ्यांनी आगारप्रमुख उबाळे यांच्यावर केली. यावेळी उबाळे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार केवळ २० ते २५ कर्मचाऱ्यांना अधिवेशनासाठी मुभा देण्यात येणार असून अन्य कर्मचारी गेल्यास त्यांच्यावर खात्यांतर्गत कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.काँग्रेसचे तालुका सरचिटणीस मंगेश मोरे यांनी एक बस जरी रद्द झाली, तर दापोली तालुक्यातील संपूर्ण खासगी गाड्या या बसस्थानकातून सोडल्या जातील व एसटीच्या विरोधात सर्वपक्षीय आंदोलन जनतेच्या हितासाठी छेडले जाईल, असा इशारा दिला.