खेड बसस्थानकात आली दोन चाकांची एसटी
बस चालविण्याची ओढ असलेल्या व एसटीवरील प्रेमापोटी मंडणगड आगारातील एका चालकाने आपल्या दुचाकीचा वापर करून शिवजयंती निमित्ताने स्वखर्चाने एसटी बसची प्रतिकृती बनवली. खेड बसस्थानकात बुधवारी दाखल झालेली दोन चाकांची एसटी बस पहायला नागरिकांनी गर्दी केली.
गेली 28 वर्षे प्रवाशांना विनाअपघात सुरक्षित सेवा देणार्या मंडणगड येथील विलास मोरे या चालकाने शिवजयंतीला कलात्मकतेने स्वतःच्या दुचाकीला बांबूचा वापर करून बसचा आकार दिला.
खेडमधील जामगे येथे सैनिक स्कूलमध्ये शिकणार्या मुलाला भेटण्यासाठी ते ही प्रतिकृती घेऊन आले होते. खेड बसस्थानक परिसरात त्यांनी आपली दुचाकी बस उभी केली असता त्यांची ही अनोखी एसटी बस पाहण्यासाठी झुंबड उडाली. ही प्रतिकृती इतकी हुबेहूब झाली आहे की, अनेकांनी या अनोख्या दोन चाकी एसटी बससोबत फोटो देखील काढले.