
पॉवर ऑफ मिडिया फाऊंडेशनचा साहित्यरत्न पुरस्कार अमोल पालये यांना जाहीर
रत्नागिरी दि.२३ प्रतिनिधी
द् पॉवर ऑफ मिडिया फ़ाऊंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने दि.२७ फेब्रुवारी रोजी जागतिक मराठी भाषा दिनी दैनिक रत्नागिरी टाइम्सचे उपसंपादक आणि लेखक अमोल पालये यांना साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दुर्गेश आखाडे यांनी दिली.
द् पॉवर ऑफ मिडिया फाऊंडेशनने जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून साहित्यलेखन करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्याचे निश्चित केले.त्यानुसार द् पॉवर ऑफ मिडिया फ़ाऊंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचा पहिला साहित्यरत्न पुरस्कार अमोल पालये यांना जाहिर झाला आहे.ज्येष्ठ रंगकर्मी राजेश गोसावी यांच्या हस्ते दि.२७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजता स्वातत्र्यंवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अमोल पालये गेली ११ वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहेत.जेष्ठ रंगभूषाकार नारायण देशपांडे स्मृती राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धेत ‘चुलखांबा’ एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. पल्लवी फाऊंडेशन, मुंबई लॉकडाऊन विषयांतर्गत राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धेत ‘लोकडावून’ एकांकिका द्वितीय,संवाद सेवा संस्था, मुंबई तर्फे आयोजित राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धेत ‘पहिली रात्र’ एकांकिका द्वितीय?अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा अमरावती आयोजित राज्यस्तरिय एकांकिका लेखन स्पर्धेत ‘देवराई’ एकांकिकेने द्वितीय क्रमांक पटकावला.’अकरित झो मरनाच्या भायरं बेफाट!’ या संगमेश्वरी बोलीतील वेबसिरिजच्या भागांचे कथा-पटकथा आणि संवादलेखन केले आहे.
कोकणातील नमन/खेळे या लोककलेचे हरवत चाललेल्या मौखिक वाङमयाचे संकलन अमोल पालये करत आहेत.त्याअंतर्गंत नमनातील म्हण्णी, कवनं, आख्यानं, बतावणी, गाणी, अंगसोंगे, वगनाट्ये ते गणनाट्य यांचे संकलन आणि अभ्यास करत आहे.नवे लेखक घडावेत यासाठी जनसेवा ग्रंथालयाच्या माध्यमातून ‘शब्दांकुर’ हस्तलिखिताचे संपादन अमोल पालये करत आहेत.मराठी साहित्य विश्वात औत्स्युक्याचा विषय ठरलेली ‘साहित्यक गुढी’ हा साहित्यिक उपक्रम सुरु केला.