
राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी नाचवली शिवरायांची पालखी
———————————————————-
देवरुख : राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिवप्रतिष्ठान समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोव्हिड नियमांचे पालन करून मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे शिवजयंती साजरी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे यावर्षी शिवजयंती साजरी करण्यात विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाचा उत्साह दिसून आला. यावेळी शिवरायांची पालखी ढोलताशांच्या गजरात नाचवण्यात आली.
विद्यार्थ्यांनी प्रथम शिवज्योत संस्थेचे संस्थापक रवींद्र माने यांच्या हस्ते प्रज्वलित करून देवरुखहून आंबव कॉलेजपर्यंत आणली. महाविद्यालयाच्या प्रांगणात शिवरायांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी सर्वांमध्ये कमालीचा उत्साह होता. यानंतर महाविद्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये समन्वयक प्रा. अच्युत राऊत यांनी आपल्या प्रास्ताविकात शिवजयंतीचे महत्व विषद केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. महेश भागवत यांनी शिवाजी महाराजांचे अतुलनीय नेतृत्व आणि समाजकल्याणासाठी त्यांनी केलेलं कार्य पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरणा देत राहील, असे मत व्यक्त केले. आजच्या युवा पिढीने त्यांच्या मार्गदर्शक तत्वांचा व गुणांचा सखोल अभ्यास करून अंगिकार केला तर एक आदर्श युवापिढी समाजाला मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी प्रा. अजित तातूगडे, प्रा. दीपक सातपुते, प्रा. मोहन गोसावी तसेच समीर यादव उपस्थित होते.
यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये नाट्य, समूह गायन, शिवचरित्राची माहिती, गीत गायन अशा विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले. आभार विद्यार्थिनी प्रतिनिधी नेहा विचारे हिने मानले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवप्रतिष्ठान समितीच्या सर्व विद्यार्थी प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.




