नाना पटाेले यांनी रत्नागिरीकरांना ज्या गाडीतून अभिवादन केले त्या गाडी मालकाला ५,८०० रुपयांचा दंड
काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी रत्नागिरीकरांना ज्या गाडीतून अभिवादन केले त्या गाडीला नंबर प्लेटच लावण्यात आली नसल्याची बाब समाेर आली आहे.तर या गाडीची कागदपत्रेही नव्हती. याची दखल घेत पाेलिसांनी गाडी मालकाला ५,८०० रुपयांचा दंड ठाेठावला आहे.
काॅंग्रेस ओबीसी सेलच्या मेळाव्यासाठी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले शुक्रवारी रत्नागिरीत आले हाेते. काॅंग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयाेजित करण्यात आला हाेता. या मेळाव्यानंतर भाजप सरकारविराेधात माेर्चाचे आयाेजन करण्यात आले हाेते. काॅंग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा माेर्चा काढण्यात येणार हाेता.
मात्र, काॅंग्रेसची नेतेमंडळी रत्नागिरीत उशिराने दाखल झाल्याने हा माेर्चा रद्द करण्यात आला. त्यामुळे काॅंग्रेस भवन येथील मेळाव्यासाठी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथून ओपन जीपमधून जाण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी घेतला.
फुलांनी सजविलेली गाडी विश्रामगृहाबाहेर तैनात करण्यात आली हाेती. या गाडीत प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष भानुदास माळी, माजी खासदार हुसेन दलवाई यांच्यासह अन्य मंडळी हाेती. विशेष म्हणजे जिल्हाध्यक्ष अविनाश लाडही या गाडीत हाेते. रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथून ते ओपन जीपमधून काॅंग्रेस भवनपर्यंत रत्नागिरीकरांना अभिवादन करत नाना पटाेले गेले.
मात्र, ज्या गाडीत ते उभे हाेते त्या गाडीला नंबर प्लेटच लावण्यात आलेली नाही ही बाब पाेलिसांच्या नजरेतून सुटली नाही. ही गाडी पाेलिसांनी ताब्यात घेऊन संबंधिताची चाैकशी केली. त्यावेळी वाहनांची आवश्यक कागदपत्रेही नसल्याचे समाेर आले. माेटार वाहन कायद्याचा भंग केल्याचे लक्षात येताच पाेलिसांनी गाडी मालकाला ५ हजार ८०० रुपयांचा दंड ठाेठावला.
www.konkantoday.com