चिपळूण पुरूष, खेड महिला संघ देवरूख नगराध्यक्ष चषकाचा मानकरी

देवरुख : श्री देवी सोळजाई क्रीडा मंडळ व नगरपंचायत देवरूख यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पुरुष गटात चिपळूण ब संघाने तर महिला गटात खेड अ संघाने पटकावले आहे. सोळजाई मंदिर येथे रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन व संगमेश्वर तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने ६९ वी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा पार पडली. यामध्ये पुरुषांचे १६ व महिलांचे १४ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत ४०० खेळाडूंबरोबरच ६० पंच उपस्थित होते. पुरुष गटातील अंतिम सामना दापोली अ विरुद्ध चिपळूण ब या संघांमध्ये अत्यंत चुरशीचा झाला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात चिपळूण ब संघाने दापोली संघावर १ गुणांनी विजय मिळवत नगराध्यक्ष चषकावर नाव कोरले. महिला गटातील अंतिम सामना खेड अ विरुद्ध खेड ब असा रंगला. यामध्ये खेड अ संघाने प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला. विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी उपांत्य फेरीत पुरुष गटातील पहिल्या सामन्यात चिपळूण ब सघाने संगमेश्वर अ संघावर १६ गुणांनी तर दापोली अ संघाने चिपळूण अ संघावर २४ गुणांनी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. महिला गटात खेड ब संघाने दापोली संघावर ९ गुणांनी तर खेड अ संघाने चिपळूण संघावर एकतर्फी ४५ गुणांनी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. स्पर्धेला शिवसेना ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर, आमदार शेखर निकम, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, मुन्ना देसाई, कोंडगाव सरपंच बापू शेटे आदी मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी देवरूखच्या नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष सान्वी संसारे सर्व नगरसेवक, नगरसेविका यांसह सोळजाई क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेट्ये, संगमेश्वर तालुका कबड्डी असोसिएशन अध्यक्ष बाबा दामुष्टे, माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, सागर शेटे, सचिन कामेरकर, ऋतुराज देवरुखकर यांसह जिल्हा व तालुका कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी रसिक, प्रेक्षक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button