
सत्तर ब च्या दाव्याचा निकाल बाजूने देण्यासाठी लाच घेताना राजापूर नायब तहसीलदाराला अटक
राजापूर : पतीच्या नावावर असलेल्या 70 ब च्या दाव्याच्या निकाल आपल्या बाजूने देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेताना राजापूरच्या प्रभारी निवासी नायब तहसीलदाराला अटक करण्यात आली आहे.
अशोक गजानन शेळके (वय 58, पदभार निवासी नायब तहसीलदार, राजापूर) असे त्याचे नाव असून ही कारवाई 16 रोजी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण ताटे, सहायक फौजदार संदीप ओगले, पोलिस हवालदार विशाल नलावडे, संतोष कोळेकर, पोलिस शिपाई राजेश गावकर, हेमंत पवार यांनी ही कारवाई केली आहे.
या विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे 70 ब चा दावा दाखल करण्यात आला आहे. याचा निकाल बाजूने देण्यासाठी अशोक शेळकेने 4 फेब्रुवारी रोजी त्यांच्याकडे 15 हजार रुपयांची मागणी केली होती. यात तडजोड करून 10 हजार रुपयांची लाच घेताना अशोक शेळकेला या पथकाने अटक केली आहे.