
जि.प.च्या इतिहासात प्रथमच घडली घटना ‘समाजकल्याण’ विभागाच्या पदभारावरून अधिकार्याला हटवले
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच एका अधिकार्याचा पदभार काढून घेण्यात आला आहे. समाजकल्याण विभागाच्या बाबतीत हा प्रकार घडला असून या समितीची सभा या विषयावरून गाजली आहे. मागील पंधरा दिवसांत विविध विकासकामांच्या फाईलवर सह्या न करणार्या या प्रभारी अधिकार्याविरोधात सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार केली आणि पदभार काढून घेण्याची मागणी केली. त्यानुसार निर्णय घेण्यात आल्याची माहिती सभापती परशुराम कदम यांनी दिली. सभापती कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी संतोष थेराडे, दीपक नागले, विनोद झगडे, सुनील तोडणकर यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. मंगळवारी झालेल्या या सभेला प्रभारी अधिकारी जिल्हा परिषदेत उशिरा आले. त्यांच्याकडून कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती. यावरुन सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सभापती, सदस्यांचा हा अवमान असल्याचे सभागृहात मत मांडले. सह्यांसाठी कामे रखडवून ठेवली जात असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी श्री. यादव यांच्याकडे सदस्यांनी तक्रार केली. सभा चालू असतानाच या अधिकार्याकडील पदभार काढून घेण्यात आला.