लांजातील कोट येथील कातळशिल्प उजेडात
लांजा : लांजा तालुक्यातील कोट ग्रामस्थांच्या सहभागातून अश्मयुगीन कातळशिल्प उजेडात आली आहेत. यासाठी ग्रामस्थांबरोबरच रत्नागिरीतील निसर्गयात्री संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेतला. ग्रामस्थ शांताराम सुर्वे यांनी येथे कातळशिल्पासारखी कलाकृती असल्याचे निसर्गयात्री संस्थेला कळवले होते. याची पाहणी करण्यासाठी जानेवारी महिन्यात निसर्गयात्री संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी पाहणी केली. सरपंच संजय पाष्टेे आणि ग्रामस्थांनी ही कातळशिल्प दृष्टीपथास आणली.येथे साफसफाई मोहीम राबवण्यात आली. यासाठी निसर्गयात्री संस्थेचे सुधीर उर्फ भाई रिसबूड, धनंजय मराठे, केदार लेले, मकरंद केसरकर, अजिंक्य प्रभुदेसाई, विजय हटकर, सायली खेडेकर, राहुल नरवणे उपस्थित होते. पन्नासहून अधिक ग्रामस्थही यात सहभागी झाले. भाताच्या उडव्या, गवताच्या वरंडी, भराभर बाजूला करून कातळशिल्प मोकळी करण्यात आली. 2.5 फूट लांबीपासून 7 फूट लांबीपर्यंतचे विविध प्रजातीतील मासे, 6 फूट लांबीची घोरपडी सदृश आकृती, विविध प्रजातींचे प्राणी, पक्षी, मोठ्या आकाराची चौकोनी उठावाची रचना आणि काही अनाकलनीय तसेच लहान आकाराच्या भौमितिक रचना अशा 30 पेक्षा अधिक खोद चित्र रचनांचा समूहच उजेडात आला.