आंबा बागेतच झाला लिलाव; पेटीला मिळाला पंचवीस हजारांचा भाव
रत्नागिरी : पावस येथे आंब्यांची पहिली पेटी विक्रीला काढण्यात आली. अमृत मँगोजने बागेतच आयोजित केलेल्या लिलावात मुहूर्ताची सहा डझनची पेटी 25 हजार रुपयांना उरणचे उद्योजक कर्नल आशुतोष काळे यांनी खरेदी केली.
पावस येथील आंबा बागेत अभिजित पाटील यांच्या अमृत मँगोजतर्फे ही लिलाव प्रक्रिया घेण्यात आली. त्यात मुंबईसह पुणे, इचलकरंजीमधील सहा व्यावसायिक कंपन्या व उद्योजक सहभागी झाले होते. लिलाव प्रक्रिया चालू करण्यापूर्वी पेटीचे पूजन श्री. पाटील व त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले. आंबा तोडणीचा मुहूर्त शुक्रवारी करण्यात आला. यावेळी बारा डझन आंब्यांची विक्री करण्यात आली.
लिलावामध्ये पहिल्या सहा डझनच्या एका पेटीची मुळ रक्कम 18 हजार रुपये ठेवण्यात आली होती. लिलावात तिला 25 हजार रुपये शेवटची बोली लागली.