एका मताच्या फरकाने ठरले मंडणगडचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष

नगराध्यक्षपदी अ‍ॅड. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्षपदी वैभव कोकाटे यांची निवड

मंडणगड : नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर नगराध्यक्ष निवडीकडे लक्ष लागले होते. मंडणगडच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीकरिता शुक्रवारी हात उंचावून प्रक्रिया पार पडली. एका मताच्या फरकाने येथील नगराध्यक्षपदी अ‍ॅड. सोनल बेर्डे तर उपनगराध्यपदी वैभव कोकाटे यांची निवड करण्यात आली.

नगरपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी भाग्यश्री मोरे व मुख्याधिकारी विनोद डवले व सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शहर विकास आघाडीकडून विनोद जाधव तर महाविकास आघाडीकडून अ‍ॅड. सोनल बेर्डे यांनी अर्ज दाखल केले होते. सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत हात वर करून निवडणूक मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. यावेळी अ‍ॅड. सोनल बेर्डे यांच्या बाजूने 9 नगरसेवकांनी हात वर करून आपले समर्थन जाहीर केले तर विनोद जाधव यांना 8 नगरसेवकांचे समर्थन मिळाले.

एका मताच्या फरकाने अ‍ॅड. सोनल बेर्डे यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भाग्यश्री मोरे यांनी जाहीर केले. उपनगराध्यक्ष पदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल करायचे होते. त्यानुसार महाविकास आघाडीकडून वैभव कोकाटे तर शहर विकास आघाडीच्यावतीने आदेश मर्चंडे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उपनगराध्यक्षाची निवड प्रक्रियाही हात वर करून राबवण्यात आली. यामध्ये वैभव कोकाटे यांना 9 तर आदेश मर्चंडे यांना 8 नगरसेवकांचे समर्थन मिळाले. एका मताने वैभव कोकाटे यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संतोष घोसाळकर, पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम, रमेश दळवी, भाई पोस्टुरे, सायली कदम, दापोलीचे माजी सभापती राजेश गुजर, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद जाधव, नेहा जाधव, दीपक घोसाळकर, दिनेश सापटे, दिनेश लेंडे, राजाराम लेंढे, राकेश साळुंखे यांनी अ‍ॅड. सोनल बेर्डे व वैभव कोकाटे यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button