फिनोलेक्सतर्फे पूर्णगड खारवीवाडीत पाणी पुरवठा योजनेला सहकार्य

पावस, ता. ५ : फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि सीएसआर भागीदार मुकुल माधव फाऊंडेशनने पूर्णगड, रत्नागिरी येथील खारवी समाज परिवर्तन मंचाला पाणी पुरवठा योजनेसाठी सहाय्य केले. बोअरवेलपासून सुमारे एक किलोमीटर लांबीचे पाईपलाईन, प्लंबिंग साहित्य आणि पाण्याची टाकी अशी सुमारे सहा लाख रुपयांची मदत कंपनीने दिली. या योजनेचे उद्घाटन आज जिल्हा परिषद सदस्या सौ. आरती तोडणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

पूर्णगड खारवीवाडी येथील मच्छीमार समाजातील सुमारे १५०० लोकांना पाण्याच्या योजनेला मदत करण्याचे आवाहन खारवी समाज परिवर्तन मंच, पूर्णगड ग्रामपंचायत यांनी फिनोलेक्स इंडस्ट्रीजला केले होते. गावकऱ्यांनी आवश्यक जमीन, बोअरवेल, वीज आणि मजूर शुल्काची व्यवस्था केली होती. बोअरवेल सुमारे एक किलोमीटरवर आहे. तिथून पाणी आणायचे होते. दुर्गम व डोंगराळ भागातून पाईपलाईन आणायची असल्याने त्यासाठी भरपूर खर्च येणार होता. परंतु फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनने तत्काळ गावकऱ्यांना पाणी आणण्यासाठी पाईपलाईन, प्लंबिंगचे साहित्य दिले आणि या प्रकल्पासाठी मोठा हातभार लावला. फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनच्या मदतीमुळे ग्रामस्थांना आता सहज पाणी उपलब्ध होणार आहे.

या पाणी प्रकल्पाचा प्रारंभ जिल्हा परिषद सदस्या सौ. आरती तोडणकर यांनी केला. याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती उत्तम सावंत, सदस्य सुशांत पाटकर, पूर्णगडचे सरपंच खुर्शीद लंबाडे, कार्यकारी अभियंता श्री. उपाध्ये उपस्थित होते. समारंभास उद्योजक दामोदर लोकरे, वासुदेव वाघेबुवा, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे मॅनेजर तानाजी काकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप करमरकर, योगेश सामंत, जनसंपर्क अधिकारी अभिषेक साळवी, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग, पूर्णगड ग्रामस्थ उपस्थित होते. या मदतीबद्दल खारवी समाज परिवर्तन मंच आणि पूर्णगड ग्रामपंचायत सदस्यांनी कंपनीचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button