भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर रविवारी सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव हे भारताचा राष्ट्रीय ध्वज गुंडाळण्यात आले होते. त्यांचे निवासस्थान असलेल्या प्रभूकुंज येथे पोलीस बॅंडद्वारे संवेदना संगीत वाजवण्यात आला होता. त्यानंतर सायंकाळी शिवाजी पार्कातही त्यांनी सैन्य आणि पोलीस दलाकडून सन्मान देण्यात आला. हिंदु धर्माच्या विधीनुसार त्यांच्या पार्थिवावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर शिवाजी पार्क येथील मैदानात त्यांच्या पार्थिवाला रात्री ७.१५ वाजता अग्नी देण्यात आला. लतादीदींचा सन्मान म्हणून त्यांना बंदुकीची सलामीही देण्यात आली. केंद्र सरकारच्या गृह विभागाने रविवारी लतादीदींच्या निधनाचे वृत्त कळताच देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तर महाराष्ट्र सरकारने सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
व्हीआयपी, सेलिब्रिटी अन् चाहत्यांचा लोटला जनसागर
लतादीदींच्या असंख्य चाहत्या वर्गाने पायीच असा प्रवास पेडर रोड ते दादरच्या शिवाजी पार्क असा केला. त्याचप्रमाणे हजारोंच्या संख्यने लतादीदींचे चाहते शिवाजी पार्कात दाखल झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी लतादीदींच्या पार्थिवाला पुष्कचक्र अर्पण केले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लतादीदींचे अंत्यदर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी आणि आदित्य ठाकरे यांनीही लतादीदींचे अंत्यदर्शन यावेळी घेतले. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांनीही आदरांजली वाहिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही लतादीदींनी पुष्पचक्र अर्पण केले.
लतादींदीच्या अंत्यदर्शनासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई खासदार सुप्रिया सुळे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विनोद तावडे, केंद्रीय मंत्री पियूष गोएल, मनसे प्रमुख राज ठाकरे, अमित ठाकरे, सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, मिलिंद नार्वेकर, शालिनी ठाकरे, भाई जगताप, मधूर भांडारकर, जावेद अख्तर, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन, आशुतोष गोवारीकर, सुनिल प्रभू, आमिर खान, रणवीर कपूर, श्रद्धा कपूर अशी विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी लतादीदींचे अंत्यदर्शन घेतले.
पेडर रोड ते शिवाजी पार्क
लतादीदींच्या पार्थिवासह असणारा ट्रक अंत्यदर्शनासाठी पेडर रोड येथील प्रभूकुंज येथील निवासस्थानापासून शिवाजी पार्कच्या दिशेने दुपारी ४.३० च्या सुमारास निघाला होता. लतादीदींसोबत मंगेशकर कुटुंबीयांपैकी आशा भोसले, उषा मंगेशकर, बैजनाथ, आदिनाथ या व्यक्ती उपस्थित होत्या. पेडर रोड ते शिवाजी पार्क असा प्रवासात अंत्यदर्शनासाठी हजारो चाहत्यांनी लतादीदींची झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी रहिवासी वस्ती असलेल्या ठिकाणी पुष्पवर्षावही करण्यात आला. सायंकाळी ५.३७ वाजता लतादीदींचे पार्थिव आणणारा रथ शिवाजी पार्कात पोहचला.
लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी आणि अंत्यविधीसाठी मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विशेष परवानगी या कार्यक्रमासाठी दिली होती. सध्याच्या दादर परिसरातील स्मशानभूमीच्या जागेच्या अडचणी पाहता विशेष बाब म्हणून ही परवानगी देण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात व्हीआय़पी आणि लाखोंचा जनसमुदाय लक्षात घेऊनच शिवाजी पार्कात ही परवानगी देण्यात आली होती.
www.konkantoday.com