
तुरळ येथे वृद्धा ठार; डोक्यावरून गेले वाहनाचे चाक, हातखंबा येथे कंटेनरचालकाला घेतले ताब्यात
आरवली : मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे एका वृध्द महिलेला अज्ञात वाहनाची धडक बसून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या महिलेच्या डोक्यावरून वाहनाचे चाक जाऊन तिचा मेंदूच बाहेर आला. हा अपघात शुक्रवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास घडला. कंटेनरसारख्या अवजड वाहनाचे चाक या महिलेच्या डोक्यावरून गेले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. संगमेश्वर पोलिस अधिक तपास करत आहेत. या महिलेचे नाव सविता शिवराम गुरव (वय 61 वर्षे) असून ती चिखली गुरववाडी येथे राहणारी आहे. तुरळ येथे काही ग्रामस्थ व रिक्षा व्यावसायिकांना ही मृत महिला दिसली. रिक्षा व्यावसायिकांनी तत्काळ ही बाब रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांच्या कानावर घातली. चव्हाण यांनी वाहतूक विभागाचे सचिन घाग यांच्याशी संपर्क साधला. तुरळ पोलिस पाटील संजय ओकटे यांनी या घटनेची खबर संगमेश्वर पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक उदयकुमार झावरे हे आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. तुरळ ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याच दरम्यान एक कंटेनर घटनास्थळी आल्याचे दिसून आला आहे. यापूर्वीच सगळीकडे नाकाबंदी करण्यात आल्याने हातखंबा येथे सदर वर्णनाचा संशयित कंटेनर अडविण्यात आला असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी पंचनामा करून प्रेत पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी घटनास्थळी पोलिस निरीक्षक उदय कुमार झावरे, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल सचिन कामेरकर, चंद्रकांत कांबळे, पोलिस पाटील वर्षा सुर्वे, संजय ओकटे, रुपेश कदम आदी उपस्थित होते.