
अर्जुनेच्या काठावर आणि आडीवरे परिसरात करकोचा कांडेसर पक्ष्यांचे आगमन
राजापूर : करकोचा-कांडेसर (कामर्या ढोक) या स्थलांतरित पक्ष्यांचे सुमारे तीन वर्षानंतर राजापूर परिसरात पुन्हा एकदा आगमन झाले आहे. गेल्या महिनाभरापासून शहरामध्ये अर्जुना नदीच्या काठावर आणि आडीवरे परिसरामध्ये त्याचे वास्तव आहे. पांढरी मान आणि शरीराचा अन्य भाग काळा अशी रंगछटा असलेला हा पक्षी आहे. सीगल पक्ष्यांसह अन्य स्थलांतरित पक्ष्यांचे तालुक्याच्या सागरी किनारपट्टीवर दरवर्षी आगमन होते. त्याप्रमाणे करकोचा-कांडेसर या पक्ष्याचेही तालुक्यामध्ये आगमन होत असल्याचे यापूर्वी आढळून आले आहे. मात्र, मध्यंतरी काही वर्ष करकोचा-कांडेसर या पक्ष्याचे थंडीच्या कालावधीमध्ये तालुका परिसरामध्ये वास्तव्य आढळले नव्हते. मात्र, यावर्षी त्याचे आगमन झाले असून राजापूर शहरासह आडीवरे परिसरामध्ये त्याचे वास्तव्य आढळून येत आहे. आकर्षक शरीराची रंगसंगती असलेला हा पक्षी गिधाडासारखा काहीसा दिसणारा असून पाणथळी भागामध्ये बहुतांशवेळा वास्तव्याला आढळतो. थव्याने राहण्याऐवजी एकटाच राहण्याला त्याची पसंती असते.