
रत्नदुर्ग किल्ल्यावरील उद्यानात उभारणार शिवसृष्टी
रत्नागिरी : नजीकच्या रत्नदुर्ग किल्ल्यावरील उद्यानात शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. यासाठी ना. उदय सामंत यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत रत्नागिरी तालुक्याला एकूण 5 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यातून ही शिवसृष्टी उभारण्यास मदत होणार आहे. या निधीमुळे रत्नागिरी तालुक्यातील पर्यटन स्थळांचे रूपडे पालटणार आहे.
तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी ना. उदय सामंत यांच्या प्रयत्नांतून मंत्रालय स्तरावर बैठक देखील आयोजित करण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सदर निधी मिळण्यासाठी ना. सामंत यांनी विशेष प्रयत्न केले होते.
भाट्ये समुद्रकिनारी पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी व परिसर विकसित करण्यासाठी 1 कोटी, आरे-वारे समुद्रकिनारी पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी व परिसर विकसित करण्यासाठी 1 कोटी, श्री क्षेत्र पावस येथील परिसरातील विकास कामांसाठी 1 कोटी असा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमुळे ही पर्यटनस्थळे विकसित करण्याच्या कामाला अधिक गती मिळणार आहे.