जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांवर किमान दोन महिने कालावधीसाठी प्रशासक येऊ शकतो-निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान
राज्य सरकारने जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या सदस्यांची संख्या वाढविण्याच्या निर्णय घेतल्यामुळे नियोजित वेळेत गट आणि गणांची पुनर्रचना करता आलेली नाही.झेडपी आणि पंचायत समित्यांच्या विद्यमान पदाधिकारी आणि सदस्यांचा कार्यकाळ संपण्यास अवघा दीड महिना शिल्लक राहिला आहे. इतक्या अल्प कालावधीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे अशक्य आहे. त्यामुळे जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांवर किमान दोन महिने कालावधीसाठी प्रशासक येऊ शकतो, असे राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी सांगितले.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर प्रशासक येणार असला तरी लवकरच या संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली जाणार असल्याचेही मदान यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी मदान यांनी ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीला असोशिएशनचे अध्यक्ष कैलास गोरे पाटील, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने, वर्धा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता घाखरे, पुणे जिल्हा परिषदेतील गटनेते शरद बुट्टे पाटील, जालना जिल्हा परिषदेचे जयमंगल जाधव आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com