
शहरांमध्ये केरोसीन बंद केल्याने गॅस सिलिंडरचा वापर वाढला
रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व शहरे केरोसीनमुक्त झाली आहेत. गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या कुटुंबाला केरोसीन पुरवठा बंद केला आहे. जिल्ह्यात एकूण ४ लाख ४० हजार ४७३ शिधापत्रिकाधारक आहेत. त्यापैकी ३ लाख ५३ हजार २३१ शिधापत्रिकाधारकांकडे गॅस जोडण्या आहेत तर ६९ हजार ८९२ शिधापत्रिकाधारकांकडे गॅस जोडणी नसल्याने केरोसीनसाठी पात्र आहे. म्हणजे आजही या कुटुंबामध्ये चूल पेटत असल्याचे स्पष्ट झाले आहे. १२ हजार लिटरच्या १९ टॅंकरद्वारे त्यांना केरोसीन पुरवठा होत आहे. पुर्वीच्या तुलनेत गॅस जोडणीमुळे सुमारे १ लाख ३१ हजार लिटर रॉकेल पुरवठा कपात झाला आहे.
जिल्ह्यात यापूर्वी ग्रामीण भागासह शहरांमध्ये चूल, स्टोव्ह, दिवा पेटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रॉकेल पुरवठा होत होता. मागणी मोठी असल्याने १२ हजार लिटरच्या ३१ टॅंकरद्वारे रॉकेल पुरवठा होत होता; परंतु कालांतराने गॅस सिलिंडरचा वापर वाढला. शासनाने गॅस जोडणी असलेल्या कुटुंबांचा रॉकेल पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील ४ लाख ४० हजार ४७३ शिधापत्रिकाधारकांचा सर्व्हे करण्यात आला.