
रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलच्या समस्यांचा उबाठाने विचारला जाब, आंदोलन करण्याचा इशारा
_रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या कारभारामुळे येथे जाणार्या सर्वसामान्य रूग्णांची आरोग्य सेवेसाठी होणारी परवड आणि त्या बाबतच्या तक्रारींचा जाब विचारण्यासाठी उबाठा शिवसेनेचे येथील पदाधिकारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर धडकले. रूग्णालयाचा कारभार सांभाळणारे महाविद्यालयाचे डीन डॉ. रामानंद यांना या प्रश्नांवर खडा जाब विचारण्यात येवून येथील वैद्यकीय कारभारात तत्काळ सुधारणा करण्यासाठी ठणकावले.बडा घर नी पोकळ वासा या म्हणीप्रमाणे जिल्ह्याचे सर्वात मुख्य रूग्णालय असणारे जिल्हा रूग्णालयामध्ये सर्वत्र सुधारणा, दुरूस्तीची रंगरंगोली चालू असल्याची टीका उबाठा शिवसेनेने केली आहे. परंतु गेले कित्येक महिने भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी नाहीत. केसपेपरसाठी वयोवृद्ध रूग्णांना पहिल्या मजल्यावर होणारी ओढाताण, एक्सरेसारखी सुविधा मात्र आहे, परंतु एक्सरे फिल्म मात्र साध्या झेरॉक्स पेपरवर दिली जाते. सीटीस्कॅन मशीन आहे, परंतु पेशंटला द्यायला फिल्म नाही. इमारतीत सर्वत्र दुर्गंधी अशा अनेक समस्या येथे असल्याचे उबाठा तालुकाप्रमुख बंड्या साळवी व पदाधिकार्यांची तक्रार आहे. www.konkantoday.com