
गुहागरचे गणपती बाप्पा मुंबईला
गुहागर : माघ महिन्यातील शुध्द चतुर्थीला म्हणजेच विनायकी चतुर्थीला गणेशमूर्तींची स्थापना करण्याची प्रथा आहे. मुंबईतील एका गणेश भक्ताने या उत्सवासाठी शाडू मातीची मूर्ती गुहागरातून नेली आहे. पूर्णपणे हाती बनवलेल्या या मूर्तीच्या सौंदर्याची प्रशंसा यानिमित्ताने गुहागकरांनी केली. रविवारी ही मूर्ती नेण्यात आली. कोरोना,
अतिवृष्टी, महापूर अशा बदललेल्या चक्रामुळे अनेकांना भाद्रपदात गणेशमूर्ती घरी आणता आल्या नाहीत. माघ शु. चतुर्थीला गणेशाचा जन्मोत्सव अनेक ठिकाणी साजरा केला जातो. हाच धागा पकडून काहीजणांनी माघ महिन्यातील चतुर्थीला गणेशमूर्ती घरी आणण्यास सुरुवात केली आहे. परंतु यामध्ये गैरसोय असते ती गणेशमूर्तींची. मुंबईमध्ये सहजपणे माघ महिन्यात गणेशमूर्ती मिळत नाहीत. त्यावर पर्याय म्हणून बोरीवलीच्या सहस्रबुध्दे कुटुंबाने थेट गुहागरातील मूर्तीकार संदीप बारटक्के यांच्याकडे गणेश मूर्तीची मागणी केली. रविवारी ही मूर्ती नेण्यात आली.