
विधानपरिषद आमदारांची यादी रखडली; राज्यपालांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार : ना. सामंत
रत्नागिरी : विधान परिषदेसाठी १२ आमदारांची यादी सव्वावर्षापूर्वीच राज्यपालांकडे कॅबिनेटच्या मंजुरीने पाठवण्यात आली आहे. मात्र त्यांनी ती अजून मंजूर केलेली नाही. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करता येईल का? असा विचार आपण करत असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. शिवसेनेकडून किंवा महाविकास आघाडीकडून नाही तर वैयक्तिक स्तरावर आपण असा विचार करत असल्याचे ते म्हणाले. रत्नागिरीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. सोमवारपर्यंत याबाबत काहीतरी निर्णय घेऊ. यावर आपण स्वत: याचिका दाखल करु किंवा ज्या १२ जणांची नावे या यादीत आहेत, त्यांच्यापैकी कोणी याचिका दाखल करेल, असे काहीही निश्चित नाही. विधिज्ञांशी चर्चा करुन मगच त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे ना. सामंत म्हणाले.