
२४ टन खैर लाकडाचा साठा जप्त; एटीएसचा लांजा तालुक्यात छापा, दोघे ताब्यात
रत्नागिरी :* ठाणे युनिटच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी लांजा तालुक्यातील देवधे गावात कारवाई करत ग्रीन वेव्ह ग्रो या कंपनीवर छापा टाकला. या कारवाईत तब्बल २४ टन खैर लाकडाचा बेकायदेशीर साठा व तस्करीसाठी वापरण्यात येणारा ट्रक जप्त करण्यात आला आहे. यासह दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे २६ लाख ४० हजार रुपये आहे.ही कारवाई लांजा तालुक्यातील देवधे येथील गट क्रमांक ४४८ मध्ये असलेल्या ग्रीन वेव्ह ग्रो कंपनीच्या कारखान्यावर करण्यात आली.
छाप्यादरम्यान ९ टन खैर लाकडाचे ओंडके (मूल्य ₹७.६५ लाख), टाटा १६१३ ट्रक (एमएच ०६ ए क्यू ७५५१, किंमत ₹६ लाख) आणि कंपनीच्या आवारात साठवलेले १५ टन खैर लाकडे (मूल्य ₹१२.७५ लाख) असा एकूण २४ टन साठा सापडला. सर्व लाकूड व वाहन बेकायदेशीररीत्या साठवले व वापरले जात असल्याचे निदर्शनास आले.या प्रकरणी मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०३(२), ३१७, ३(५), ६१ आणि भारतीय वन अधिनियम १९२७ तसेच महाराष्ट्र वन नियमावली अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत इम्तियाज कमल बरमारे (वय ५३, रा. साई समर्थ कॉम्प्लेक्स, लांजा, रत्नागिरी) आणि सुफियान युसूफ नाचण (वय ४९, रा. घर नं. १०६, मामू हॉटेलजवळ, भिवंडी, ठाणे) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त केलेला सगळा मुद्देमाल वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.




