बालिकेला पांगरी पुलाखाली सोडून देणाऱ्याना अटक

कुवारबाव येथील मातेसह हातखंबा येथील तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील पांगरी गाव पऱ्या येथे बालिकेला सोडून गेलेल्या नराधमांचा शोध पोलिसांनी घेतला आहे. या प्रकरणी बालिकेच्या आईसह अन्य एका तरुणाला रत्नागिरीतील कुवारबाव येथून अटक केली आहे. पोलिसांनी झटपट लावलेल्या या तपासाचे कौतुक होत आहे.

25 जानेवारी रोजी पांगरी येथे गाव पऱ्याखाली बालिका बेवारस सापडली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी देवरुख पोलिसांनी ठिकठिकाणी पथक पाठवून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. 3 दिवसांत या प्रकरणातील आरोपींना शोधण्यात देवरूख पोलिसांना यश आले. कुवारबाव बाजारपेठ येथे राहणाऱ्या तिच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले. सौ. सांची स्वरूप कांबळे (पूर्वाश्रमीची शितल श्रीपत माईंगडे वय २६, सध्या राहणार कुवारबाव, बाजारपेठ ता. जि. रत्नागिरी) असे तिचे नाव आहे. तर तिला मदत करणारा मिथिल उर्फ मिथिलेश मदन डांगे (वय २३, रा. हातखंबा, डांगेवाडी ता. जि. रत्नागिरी) यालाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे या प्रकरणाच्या अनुषंगाने तपास करण्यात आला असता त्यांनी त्या बालिकेला २४ जानेवारी रोजी रात्री ११.३० वा. दरम्यान पांगरी गाव पऱ्यामधे टाकल्याचे कबूल केलेले आहे. त्यावरून त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, बेवारस बालिकेच्या आईवडिलांची ओळख पटवण्यासाठी प्रसिद्धी पत्रक तयार करून त्याची सोशल मीडिया तसेच वर्तमानपत्रातून प्रसिद्धी करण्यात आली होती. तसेच खबऱ्यांमार्फत गोपनीय माहिती मिळवण्यात आली. यावेळी रत्नागिरी येथे राहणाऱ्या तिच्या आईचा पत्ता लागला.
या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी निवास साळोखे, पोलिस निरीक्षक बाळकृष्ण जाधव व पोलिस निरीक्षक यु. जे. झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपनिरीक्षक विद्या पाटील, व्ही. डी. मावळंकर, एस. एस. भुजबळराव, एस. एस. सडकर, जे. जे तडवी, पोलिस नाईक के. एम. जोयशी, पोलिस नाईक एस. डी. जाधव, पोलिस शिपाई आर. आर. कांबळे, पोलिस शिपाई डी. एम. मांढरे या पथकाने आरोपींचा शोध घेऊन चांगली कामगिरी पार पाडली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button