बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रखडलेल्या दाभाेळे ते वाटूळ रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे -काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांची मागणी
ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रखडलेल्या राजापूर-लांजा तालुक्यातील दाभाेळे ते वाटूळ रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे.याबाबतचे एक लेखी निवेदन लाड यांनी ना. चव्हाण यांना दिले आहे. लांजा पूर्व भागातील दाभेळ ते वाटूळ या रस्त्याची गेल्या कित्येक वर्षांपासून दुरावस्था झालेली आहे. हा रस्ता दुरुस्त यासाठी जनतेकडून आंदोलनेही केली गेली आहेत. या रस्त्याची इतकी दयनिय अवस्था झाली आहे की वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मोठया प्रमाणावर या रस्त्यावरून वाहनाची येजा होत असल्याने व अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची अक्षरशा चाळण झाली आहे.
हा रस्ता पुर्ण न होण्यासाठी येथील सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असून या रस्त्याकडे जाणूनबुजून संबधीत विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप लाड यांनी केला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रयत्नाने या रस्त्यांसाठी जागतिक बँकेने निधी उपलब्धही करून दिला आहे. तसेच या रस्त्याच्या कामाची ऑर्डर गेल्या दोन वर्षांपूर्वीच निघाली आहे. मात्र येथील बेजबाबदार अधिकारी आणि ठेकेदाराच्या मनमानीमुळे हा रस्ता रखडला असल्याचे लाड यांनी नमुद केले आहे.
www.konkantoday.com