
रत्नागिरी शहरातील नगरपरिषदेच्या शाळांची दुर्दशा ; प्रभावी, कल्पक धोरण नसल्याने मराठी शाळांवर अवकळा – ॲड. दीपक पटवर्धन
रत्नागिरी नगर परिषदेच्या २२ शाळा सुरू होत्या. त्यापैकी ४ शाळा बंद पडल्या. आज ८९ शिक्षक १९०० च्या आसपास विद्यार्थी आणि १८ शाळा अशी स्थिती कागदावर दिसते. मात्र या १८ शाळांपैकी अनेक शाळात केवळ ७ ते २० एवढीच पट संख्या आहे.
लोकमान्य टिळकांचे नाव असलेली व लोकमान्य टिळक हे ज्या शाळेत काही महिने शिकले अशी शाळा क्र.२ ही इमारत पडून अनेक महिने झाले. मात्र नगरपरिषद ही इमारत परत बांधण्याबाबत मूग गिळून आहे. लोकमान्य टिळकांच्या नावाशी जोडलेली ही शाळा आज विस्थापित आहे. रत्नागिरीतील सुज्ञ जनतेने चाललेली ही सरस्वतीची अवहेलना निमूट पाहणे हे रत्नागिरीच्या संस्कृतीला गौरवास्पद नाही. अधिकार असणारी यंत्रणा या शाळेकडे कोणत्या दृष्टीने पाहतात ह्याची कल्पना आता सर्वांना आली आहे. हे विद्यालय परत उभ राहिल पाहिजे. यासाठी जनचळवळ उभी करुया. ती उत्स्फूर्त उभी करुया असे आवाहन करावे असे प्रकर्षाने वाटते.
शाळा क्र.१ या शाळेचा पट जेमतेम १४ या शाळेत स्वच्छतालय पुरेशी नाहीत. सेप्टीक टॅंक पूर्ण उघडी, प्रवेशद्वाराजवळ दगडधोंड्यांचा ढीग अशा अवस्थेत मुलं या मराठी शाळांमध्ये कशासाठी येतील ? हा प्रश्न काल या शाळांना भेट दिली त्यावेळी शाळांमधील चैतन्यहीन स्थिती अनुभवास आली.
शाळा क्र.५ हे स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय या विद्यालयाच्या प्रवेशद्वारचा शाळेच्या नावाचा बोर्ड पूर्ण गंजलेल्या स्थितीत आढळला. स्वा.सावरकरांचे नाव असलेला हा बोर्ड राजकीय परीपेक्षातून जाणीवपूर्वक असा ठेवण्यात आला आहे. ज्या शाळेवर बोर्डही नेटका नाही त्या शाळेची अवस्था केवळ ८ मुलांचा पट एवढीच राहिली आहे. बहुतांश वर्गखोल्या कुलूपबंद आहेत. २ शिक्षक शाळेत आहेत. १ ली ते ७ वीचे वर्ग असणारी ही शाळा आता १ ली ते ४ थी अशी झाली आहे. इमारतीचे छप्पर धोकादायक आहे. शाळेच्या परिसरात सरपटणारे साप अनेकवेळा समोर दिसतात अशी शाळेची विष्पन्न अवस्था पाहून मन उद्विग्न झाले.
रत्नागिरी शहरातल्या ४ शाळा बंद होतात. अनेक शाळांमध्ये १० चा ही पट नाही. सुविधांची वानवा, शैक्षणिक वातावरण, उत्साहवर्धक वातावरण याचा अभाव, मराठी शाळांकडे कल कमी का ? याबाबत आत्मचिंतन करण्यासाठी यंत्रणा सक्षम नाही. ज्यांच्या हातात ही व्यवस्था आहे ते अन्य विषयांना प्राधान्य देतात. एका बाजूला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी हलकल्लोळ होत असताना सुविद्य, सुसंस्कृत रत्नागिरी मधील मराठी शाळा, सरस्वतीची मंदिरे ओस पडली आहेत. त्यांची अवस्था दैन्यावस्था म्हणावी अशी आहे. मराठी शाळांबाबत कोणतेही ठोस धोरण नाही. कोणताही कल्पक कार्यक्रम नाही. केवळ शिक्षक नेमून वर्गखोल्यांचे कोंडवाडे अशी स्थिती झाली आहे. शैक्षणिक चळवळीला महत्त्व देणारी व्यवस्था नाही. रस्ते खड्ड्यात गेलेले त्याबरोबर शाळाही खड्ड्यात जात चाललेल्या अशी स्थिती आहे.
रत्नागिरीतील मराठी शाळांचा प्रश्न घेऊन तो धसास लावण्यासाठी प्रत्येक पातळीवर प्रयत्न करणार. शाळा क्र.२ ची पुनर्बांधणी झालीच पाहिजे यासाठी आग्रही राहाणार असल्याचे भा.ज.पा जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी सांगितले. श्री. सचिन करमरकर, श्री. बाबू सूर्वे, श्री.नितीन जाधव, सौ.रसाळ, सौ. करमरकर, सौ रायकर, श्री राजू तोडणकर या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसह काल मराठी शाळांना भेटी दिल्यानंतर ही प्रतिक्रिया ॲड. पटवर्धन यांनी दिली.
भारतीय जनता पार्टी सौ.सुमिता भावे, सौ.दक्षायानी बोपर्डीकर, श्री.प्रमोद खेडेकर, श्री.मनोज पाटणकर, श्री योगेश हळदवणेकर व नगरसेवक यांची समिती नियुक्त करत असून रत्नागिरीतील नगरपालिकांच्या शाळा त्यांचे भवितव्य याबाबत माहिती घेवून एक धोरण तयार करण्याचे काम या समितीकडे सोपवण्यात आले असून एक महिन्यात त्यांनी याबाबत धोरण पार्टीकडे सादर करावे असे ठरविण्यात आले असल्याची माहिती शहराध्यक्ष श्री.सचिन करमरकर यांनी दिली.
www.konkantoday.com