
ज्येष्ठ लेखिका स्मिता देवधर यांच्या ५० व्या पुस्तकाचे प्रकाशन
चिपळूण : कोमसाप चिपळूण शाखेच्या वतीने येथील ज्येष्ठ लेखिका स्मिता देवधर यांच्या ५० व्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच ‘लोटिस्मा’च्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात समाजवादी विचारवंत प्रा. विनायक होमकळस यांच्याहस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ लेखक प्रकाश जाधव, नामवंत कवी-समीक्षक अरुण इंगवले उपस्थित होते. या कार्यक्रमात देवधर यांची राजमाता जिजाऊ, महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु. ल. देशपांडे, काव्यसुमनांजली ही तीन पुस्तके प्रकाशित झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण इंगवले यांनी केले. मान्यवर पाहुण्यांनी यावेळी देवधर यांच्या लेखनातील समाजभान, सत्यघटनांचे वर्णन, सातत्य आदींचे महत्त्व विषद केले. प्रा. अंजली बर्वे यांनी ‘काव्यसुमनांजली’ मधील काव्याचे वैविध्य, अर्थ आणि भावसौंदर्य सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमात देवधर यांच्या परदेशी एकांकिकेतील प्रवेश, सुंदर माझं घर ही नाटुकली सादर करण्यात आली. शाहीर शिवाजी शिंदे यांनी देवधर यांनी लिहिलेला महाराष्ट्राचा पोवाडा सादर केला. विद्या तांबे, नीता तांबे, सुनेत्रा आपटे, प्रा. संगीता जोशी, अपर्णा नातू यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. या निमित्ताने देवधर यांची मुलाखत कीर्तनकार अंजली साने आणि स्नेहवर्धिनी मंडळाच्या कार्यवाह नेहा सोमण यांनी घेतली.
कार्यक्रमाच्या पुस्तक प्रकाशन सोहोळ्याचे सूत्रसंचालन मनिषा दामले यांनी तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली बर्वे यांनी केले. कोमसापच्या चिपळूण अध्यक्ष डॉ. रेखा देशपांडे, मसाप चिपळूण शाखेचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, ‘लोटिस्मा’चे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, कोवॅस संस्थापिका सुमती जांभेकर, डॉ. मीनल थत्ते, सुनील खेडेकर, अभिजित देशमाने, कैसर देसाई उपस्थित होते.