
महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगाने पूर्ण झाले पाहिजे याबाबत दुमत नाही पण चक्काजाम आंदोलन हा केवळ फार्स आहे नैतिक आधार नसलेले आंदोलन – ॲड. दीपक पटवर्धन
महामार्गाचे रखडलेले काम वेगाने पूर्ण झालेच पाहिजे याबाबत दुमत नाही पण महामार्गाचे काम इतका काळ का रखडले ? कंत्राटदारांचा हलगर्जीपणा बरोबरच लोकप्रतिनिधी हेच या दिरंगाईला कारणीभूत आहेत. ना. गडकरी साहेब यांनी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करतानाच आयोजित कार्यक्रमात सांगितले होते की योजना मंजूर होऊन कामाचा शुभारंभ होत आहे. मात्र काम वेळेत पूर्ण होण्यासाठी लोकप्रतिनिधींचा रोल महत्त्वाचा आहे. कामात कोणती अडचण येणार नाही हे लोकप्रतिनिधींनी पाहायचे आहे. महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून आजपर्यंत केंद्रात सत्तेत असलेल्या भा.ज.पा.चा रत्नागिरी जिल्ह्यात एकही लोकप्रतिनिधी नाही. त्यामुळे अपूर्ण रस्त्याचे दायित्व हे या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींचे राहते. आंदोलन करायचे होते तर ते सात वर्षांनी इतक्या उशिराने का ? यामागे काय दडलय ते ही जनतेला कळायला हवे. चक्काजाम आंदोलन हा राजकीय फार्स होता केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा हा प्रयत्न होता. चक्काजाम आंदोलन करण्यासाठी लागते ती नैतिकता या आंदोलनात नव्हती.
गावोगावी रस्ते शिल्लक आहेत का ?
या राज्याचे राज्यकर्ते म्हणून अनेक जबाबदाऱ्या महाआघाडी शासनकर्त्यांच्या, लोकप्रतिनिधीच्या व राज्य शासनाच्या आहेत. महामार्गाचे काम धिम्या गतीने तरी सुरू आहे पण जिल्ह्यातील गावोगावी जाणारे रस्ते अस्तित्वात नाहीत अशी स्थिती अनेक गावातील रस्ते, रस्ते कमी खड्डे जास्त अशा स्थितीत महिनोन महिने आहेत. त्याबाबत लोकप्रतिनिधीना काय म्हणायचे आहे की आजचे आंदोलन गावोगावच्या, रस्त्यांच्या स्थितीच्या निषेधार्थ आंदोलन होते का ? महामार्गाची वाईट स्थिती सुधारायला हवी त्याचबरोबर खेडोपाड्यात गावोगावी जाणारे रस्ते नेटके करण्याची जागरूकता लोकप्रतिनिधीनी दाखवावी.
जर्जर आरोग्य यंत्रणा
रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा उडालेला बोजवारा जबाबदारी राज्य शासनाची आहे, याचेही ध्यान रहावे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पोस्ट रिकाम्या आहेत. भूलतज्ञ पूर्ण वेळ उपलब्ध नाही, अशा स्थितीत एवढे मोठे हॉस्पिटल रुग्णांच्या जीवाशी खेळत आहे. याकडेही लोकप्रतिनिधीनी पाहावे. अवघ्या जिल्हा रुग्णालयाची तीच अवस्था गावोगावी उभ्या असलेल्या आरोग्य सुविधांची याचे भान सत्ताधीशांना असावे.
खंडहर झालेले रत्नागिरीतील ठिकाण
रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती बसस्थानक गेली दोन वर्षे एक खंडहर स्थितीत आहे. केवळ मातीचे ढिगारे त्या ठिकाणी आहेत. एस.टी. स्टँडचे काम ठप्प आहे. रत्नागिरी शहराच्या मध्यवस्तीत अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी विपन्नावस्थेत पडलेला एस.टी.स्टँड याची ही जबाबदारी राज्यशासनाची आहे. याचा विसर नको. राज्य शासनाच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अखत्यारीतील अनेक कामे गेली दोन वर्षे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे जनता वेठीस धरली जात आहे. रत्नागिरीतील नवी पाणी योजना अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही. शहरातील सर्व रस्ते जानेवारी २०२२ संपूनही खणलेले, खड्डेमय, धुळीने माखलेलेच आहेत. त्यामुळे ही जनता त्रस्त आहे. लोकप्रतिनिधी म्हणून केवळ आपमतलबीपणे महामार्गा पुरते आंदोलन आणि बाकीचे प्रश्नांबाबत दुर्लक्ष हे स्वतःची जबाबदारी टाळणारे म्हणूनच काही तरी साध्य करण्यासाठी केलेला फार्स होता. जनतेच्या डोळ्यात धूळफेक होती अशी परखड प्रतिक्रिया ॲड. दीपक पटवर्धन, जिल्हाध्यक्ष, भा.ज.पा दक्षिण रत्नागिरी यांनी दिली.