स्वरांजली स्वरभास्कराला
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
गेली कित्येक दशकं २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला न चुकता आपण सगळेच मिले सूर मेरा तुम्हांरा ऐकत आलो आहोत. आपल्यासारख्या जनसमान्यांनी ह्या गाण्याला जवळपास राष्ट्रगीताइतकंच महत्व दिलं आहे. ह्या गाण्याची सुरुवात ज्या भारदस्त आवाजाने होते ते पंडित भीमसेन जोशी हे खऱ्या अर्थाने भारतीय शास्त्रीय संगीताचे अध्वर्यू !
जवळपास सात दशकांची सांगीतिक कारकीर्द असलेल्या पंडितजीनी भारतीय शास्त्रीय संगीतविश्व समृद्ध केलं. साठच्या दशकात भीमसेनजींनी विदेशात इतके कार्यक्रम केले की पु ल देशपांडे त्यांना गंमतीने हवाई गंधर्व म्हणाले होते. भारतीय वाद्यसंगीत विदेशात लोकप्रिय करण्यात पं रविशंकरांचा जसा मोलाचा सहभाग आहे तसाच सहभाग भारतीय कंठसंगीताबाबतीत भीमसेनजींचा आहे. किराणा घराण्याची पताका स्वतःच्या खांद्यावर समर्थपणे सांभाळताना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताला संतवाणी ही अनमोल देणगी दिली. जसे मराठी अभंग लोकप्रिय केले तसेच कानडी संतांच्या रचनासुद्धा सर्वभाषिक रसिकांमध्ये लोकप्रिय केल्या. भाग्यदा लक्ष्मी हे त्याचं एक उदाहरण! भारतीय एकात्मकतेचं उत्तम उदाहरण होते भीमसेनजी!
पंडितजींचा कार्यक्रम व्हावा हे संस्था म्हणून आपलंही स्वप्न होतंच की! पण आपली सुरुवात अशा काळात झाली जेंव्हा पंडितजींना इतका प्रवास करून आणणं शक्य नव्हतं आणि इतक्या मोकळ्या वातावरणात गायनाची विनंती करणं त्याहून शक्य नव्हतं. ते स्वप्नच राहिलं आता! अशा काही गोष्टी राहूनच गेल्या. पंडितजी येऊ शकले नाहीत. गानसरस्वती किशोरी आमोणकर ह्यांना आणण्यात आम्ही कच खाल्ली. बिरजुमहाराजजी ह्यांना बोलावणं सहज शक्य झालं होतं कारण २०१८ ला त्यांची नात रागिणी येऊन गेली होती. पण त्यांना आणि पं. शिवकुमार शर्मा ह्यांना विमानसेवा नाही ह्या एकाच कारणासाठी आणता आलं नाही.आता तर बिरजुमहाराजजी पण नाहीत. शिवजीना आणणे हे आपल्या बकेट लिस्टमध्ये अजूनही आहे. तर …….
२०११ चा महोत्सव २१ ते २३ जानेवारी दरम्यान ठरला होता. त्यावेळी पंडितजी आजारीच होते. महोत्सव पार पडला आणि २४ ला सकाळी बातमी आली ती पंडितजींच्या निधनाची! कार्यक्रम सांगतेच्या दुसऱ्या दिवशी निधन झाल्याने संस्था म्हणून सामुदायिकरित्या श्रद्धांजली अर्पण करणं शक्य नव्हतं. त्यामुळे सोमवारी २४ तारखेला आवराआवर करत असताना संस्थेतर्फे थिबा राजवाड्याच्या प्रांगणातील स्टेजवर स्क्रीन उभा करून त्यावर पंडितजींच्या जीवनावरील डॉक्युमेंटरी दाखवली गेली. तरीही कार्यकर्त्यांच्या मनातील घालमेल संपली नव्हतीच. एका महान कलाकाराच्या, महान आयोजकाच्या आणि तितक्याच महान शिष्योत्तमाच्या कारकिर्दीला म्हणावी तशी आदरांजली देता आली नाही ह्याचं शल्य मनात होतं. कार्यकर्त्यांच्या चर्चा चालूच होत्या. त्यातून एक संकल्पना पुढे आली ती स्थानिक कलाकारांना साद घालण्याची! शहराशहरात, गावागावात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी पंडितजींच्या अभंगवाणीतील रचना सादर करून स्थानिक सांस्कृतिक वातावरण समृद्ध केलं. असे कलाकार आपल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा होते आणि त्यांच्याही मनात पंडितजीना श्रद्धांजली देण्यासाठी काही करण्याची मनापासून ईच्छा होती. त्यातील बहुतांश कलाकारांशी संपर्क झाला आणि सर्वांनीच एकत्रित येण्याची तयारी दर्शवली. आणि त्यातूनच स्वरांजली ह्या उपक्रमाची योजना ठरली.
सर्व कलाकारांशी चर्चा केल्यानंतर असं ठरलं की प्रत्येकाने किमान २० मिनिटं शास्त्रीय संगीतातील एखादा राग सादर करावा आणि त्यानंतर एखादी उपशास्त्रीय रचना अथवा अभंग सादर करावा. ह्यात 2 तासांचा वेळ हा स्वतंत्रपणे फक्त अभंगवाणी साठी निश्चित केला गेला. त्यामध्ये फक्त भावसंगीत सादर करणाऱ्या कलाकारांचा अंतर्भाव केला गेला.
एकूण २६ कलाकारांनी रागदारी मांडणी केली आणि ७ कलाकार अभंगवाणी मध्ये सामील झाले. त्यांना साथसंगत करणाऱ्या २५ साथीदारांमुळे हा उपक्रम यशस्वी होऊ शकला होता. सकाळी बरोबर ६ वाजता सुरू झालेला हा स्वरयज्ञ १८ तासांच्या सलग सादरीकरणानंतर रात्री 1 वाजता शांत झाला.
ह्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी होती की रंगमंचासमोर एका कोचावर शाल अंथरली होती आणि त्यावर पंडितजींचा फोटो ठेवला होता. त्यामागची भावना होती की पंडितजी आजही सांगीतिक स्वरूपात आपल्यात आहेत आणि आपण त्यांच्यासमोर आपली सेवा सादर करत आहोत. दुसरी विशेष बाब होती की पूर्ण कार्यक्रमाला वेगळा निवेदक नव्हता. कलाकाराने पंडितजींना आपली ओळख स्वतः करून द्यावी व आपल्या साथीदारांची ओळख करून देतानाच ज्या गुरूंकडे आपण शिकलो त्यांचीही ओळख द्यावी ह्या भावनेने स्वतंत्र निवेदकाचे प्रयोजन केले नव्हते. अपेक्षा होती की त्यातून आपल्यापेक्षा आपल्या गुरूंबद्दल दोन अधिकचे शब्द रसिकांपर्यंत पोहोचावेत. म्हणजे ज्या पद्धतीने भीमसेनजीनी आपले गुरू सवाई गंधर्व ह्यांचं नाव अजरामर केलं त्याप्रमाणे पण आपापल्या वकुबानुसार आपल्या गुरूंच्या सांगीतिक प्रतिभेची आपल्या सादरीकरणातून ओळख करून द्यावी. अर्थात ही संकल्पना त्यावेळी सर्वांना पटली असं नव्हतं. पण गुरूंप्रति आदरभाव व्यक्त करण्याचा प्रयत्न म्हणून त्याकडे पाहता येईल.
भारतरत्न स्वरभास्कर पं भीमसेन जोशी ह्यांच्या भव्य दिव्य व्यक्तिमत्वाला सर्वसमावेशक आदरांजली वाहण्याची कार्यकर्त्यांची ईच्छा केवळ भीमसेनजींच्या नावामुळेच शक्य झाली ह्याची जाणीव प्रत्येकाच्या मनात होती. अन्य कोणत्याही कारणासाठी अशा पद्धतीने कलाकार एकत्र आले नसते ह्याची कल्पना संस्थेला होती/ आहे.
आपल्या हयातीत सर्व रसिकांना सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या माध्यमातून स्वतःशी आणि परसस्परांशी जोडून ठेवण्यात यशस्वी झालेल्या पंडितजींनी, आपल्या देहावसनाच्या सत्तावीसाव्या दिवशी कोकणातल्या सर्व कलाकारांना एकत्र आणून शास्त्रीय संगीताची सेवा अविरत चालू ठेवण्याचा आशीर्वादच दिला ह्यावर संस्थेचा विश्वास आहे.
ज्या निष्ठेने, श्रद्धेने पंडितजींनी भारतीय शास्त्रीय संगीताची पर्यायाने निराकार आत्मरूप ओंकाराची आराधना केली त्याची परिणती अजरामर होण्यात आहे हे नक्की….
जो भजे हरी को सदा
सो ही परम पद पावेगा….
सो ही परम पद पावेगा…..
स्वरभास्कर बैठक
रविवार दिनांक ३० जानेवारी २०२२
सकाळी ५.४५ ते मध्यरात्री संपेपर्यंत
स्थळ: राधाबाई शेट्ये सभागृह, गो जो महाविद्यालय, रत्नागिरी.