
आरटीओ कार्यालयात वाहन नोंदणी प्रक्रियेत अनियमितता; तीन कर्मचारी निलंबित
रत्नागिरी:-वाहन नोंदणी प्रक्रियेतील अनियमितता आरटीओ विभागातील तिघा कर्मचाऱ्यांना भोवली आहे. रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांचा कर न भरता इतर विभागातून बॅकलॉग एन्ट्री करून वाहनांचे कर व शुल्क भरणा करून न घेता वाहनांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर परिवहन आयुक्तांनी तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामध्ये वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि एकाचा समावेश आहे.
कार्यालयामध्ये सव्वाशे वाहनांचे रजिस्ट्रेशनमध्ये अनियमितपणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ज्या कर्मचाऱ्यांचा रजिस्ट्रेशनसाठी लॉगिन आयडी वापरण्यात आला होता त्यांनी कर न
भरता १०८ त्यांची नोंदणी करून घेतली. यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी कारवाई केली. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील या तीन कर्मचाऱ्यांनी सुमारे सव्वाशे वाहनांच्या रजिस्ट्रेशनची नोंदणी केली आहे. मात्र त्याचा टॅक्स शासनाच्या तिजोरीत पडलेला नाही. टॅक्सची रक्कम परस्पर लांबविल्याचे प्राथमिकदृष्ट्या पुढे आले. सोमवारी या कारवाईचे आदेश येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. वाहनांचे कर व शुल्क भरणा करून न घेता वाहनांना नोंदणी प्रमाणपत्र जारी केल्याबद्दल प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल, व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. याला आरटीओ कार्यालयाने दुजोरा दिला.