![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2021/12/img_5506-324x160-1.jpg)
पांगरी येथे पुलाखाली सापडले बेवारस बालक
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथील स्टॉपजवळील पऱ्याच्या खालच्या बाजूला विव्हळत रडत असलेले अंदाजे 1 वर्षाचे बालक सापडले आहे.
पांगरी येथील हनुमान स्टॉपजवळील गाव पऱ्यात 4 दगडांच्या मधोमध 1 वर्षाच बालक सापडले. हे बालक 4 दिवस या ठिकाणी रडत होते, असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. कडाक्याच्या थंडीने गारठल्याने आणि रडून-रडून त्याचा घसा बसला होता. परंतु 4 दिवस मुलाच्या रडण्याचा आवाज येतोय याची गावभर चर्चा चालू झाली. प्राण्यांचा आवाज किंवा अजून काहीतरी असेल म्हणून येथील ग्रामस्थांनी दुर्लक्ष केलं.
मात्र मंगळवारी सकाळी येथील सरपंच सुनील म्हादये ग्रामपंचायतीत गेले असता त्यांना याविषयी चर्चा ऐकायला मिळाली. त्यांनी लगेच पोलिस पाटील व ग्रामस्थांना घेऊन या ठिकाणी धाव घेतली. या ठिकाणी जाऊन पाहिले तर एक स्त्री जातीचे बालक विव्हळत होते. 4 दिवस अन्न-पाण्यावाचून तडफडत होते. त्यातच थंडीने गार पडले होते. या बालकाच्या तोंडून आवाजही फुटत नव्हता. बेशुद्धावस्थेत दिसत होते. सरपंच, ग्रामसेवक अखिलेश गमरे, पोलीस पाटील श्वेता कांबळे, ग्रामस्थ तसेच वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचे मंगेश राऊत, सिएचचो सोनाली चव्हाण, आशा वर्कर दीक्षा जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत बालकाला रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. दिनेश मुळ्ये, गावप्रमुख प्रभाकर तेगडे, दत्ताराम जाधव, प्रदीप म्हादये, शिवराम दुडये आणि ग्रामस्थ यांनी सरकारी यंत्रणेची वाट न पाहता प्राथमिक उपचार सुरू केले.
घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी देवरुख पोलिसच बिट अंमलदार जावेद तडवी आणि सहकारी दाखल झाले. पोलीस या घटनेचा तपास करत असून नेमकी ही घटना काय आहे, याचा कसून तपास करण्यात येत आहे.