
चाकूच्या हल्ल्यातून रक्तबंबाळ स्थितीत ‘तो’ दाखल झाला जिल्हा रुग्णालयात
कासारवेली येथे तरुणावर चाकूने वार; पोलिसांनी केली हल्लेखोराला अटक
रत्नागिरी : दारूच्या नशेत गुन्हे करणाऱ्या तरुणाकडून आणखी एका तरुणावर चाकूने वार केल्याची घटना कासारवेली गावातील पारवाडी येथे घडली. या जखमी तरुणावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून त्याच्यावर हा जीवघेणा हल्ला करणाऱ्या तेथीलच एका तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा संशयित दारूच्या नशेत गुन्हे करत असून दहशत पसरवत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी मनोहर डोर्लेकर हे नेहमीप्रमाणे कासारवेली पारवाडी येथे आपल्या सहकाऱ्यांसमवेत गप्पा मारत बसले होते. तेथे अचानक उमेश वसावे हा तरूण हातात धारदार सुरा घेऊन धावत आला आणि मनोहर डोर्लेकर यांच्या मानेवर, हातावर वार केले आणि पळून गेला.
अचानक झालेल्या हा हल्ल्यात रक्तबंबाळ अवस्थेत असलेले मनोहर डोर्लेकर हे कासारवेली येथून चालत साखरतर येथे आले. त्यानंतर रिक्षा व्यवसायिकाने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विनित चौधरी हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या विशेष पथकाने हल्ला करणाऱ्या उमेशचा शोध घेतला व ताब्यात घेतले.
हल्ल्याचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात उमेश वसावे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
उमेश वसावे याच्या विरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.