… आता तरी जिल्हा शल्य चिकीत्सकांवर कारवाई करा!आयुष विभागप्रमुख डॉ. अश्फाक काझी यांचे उपोषण
सीएस विरोधात अनिकेत पटवर्धन यांनी केली मागणी
रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकीत्सकांविरोधात आयुष विभागप्रमुख डॉ. अश्फाक काझी यांनी उद्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा दिला आहे. आयुष विभागाला दुय्यम वागणूक देताना मानसिक त्रास देणे, उत्तम काम करूनही वेतनवाढीच्या अहवालात नकारात्मक शेरा मारणे यामुळे डॉ. काझी यांनी निवेदनाद्वारे उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
डॉ. काझी यांच्या उपोषणाला भाजयुमोचे द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी पाठबळ देत आता तरी जिल्हा शल्य चिकीत्सकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातील गैरकारभार आणि जिल्हा शल्य चिकीत्सकांयासंबंधी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी तातडीने दखल घेत किमान २ तास बैठक बोलवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, डॉ. अश्फाक काझी गेली १२ वर्षे जिल्हा रुग्णालयात आयुष वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी उल्लेखनीय कामे केल्यामुळे वेळोवेळी पुरस्कारदेखील प्राप्त झाले आहेत. कोविड काळात राज्यात सर्वप्रथम आयुष विभागामार्फत प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप जिल्ह्यात करण्यात आले. पोलिस बांधवांसाठी पोलिस कोविड सेंटर उभे करून ३५० हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार डॉ. काझी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आयुष विभागामार्फत कोविडची भीती कमी होऊन उपचारासाठी उत्स्फूर्त केले. आयुष विभागाला आयएसओ ९००१-२०१५ हे मानांकन मिळवून दिले आहे. ३० खाटांचे आयुष रुग्णालय उभे राहील याकरिता मंजुरी मिळवून घेतली.
जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांच्या वेतनवाढीकरिता दिल्या जाणाऱ्या अहवालामध्ये सकारात्मक उल्लेख केला. मात्र डॉ. काझी यांच्या अहवालात नकारात्मक बाबी नोंदवून वेतनवाढीत अडथळे निर्माण केले. जिल्हा शल्य चिकीत्सकांनी कामाचा गौरव न करता द्वेषपूर्ण वागणूक दिल्याचा आरोप डॉ. काझी यांनी केला आहे. तसेच मानसिक त्रास देऊन खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी कामाचे कौतुक न करता नकारात्मक शेरा मारला आहे.
शल्य चिकीत्सकांनी आयुष विभागाच्या कामाची अवहेलना केली, राजीनामा देण्यासाठी दबाव आणला, कधीही कामासंबंधित बैठकांना वेळ दिला नाही. आयुष विभागात इतर उपचार पद्धती सुरू केल्या. औषधांची मागणी करूनही पुरवठा केला नाही. आयुष वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना इतर कामांमध्ये गुंतवले आहे.
आयुष विभागाचा निधी परत जाणार?
जिल्हा रुग्णालयात आयुष विभाग सुरू करण्याकरिता डॉ. काझी यांनी पुढाकार घेतला. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आवारात पडीक असलेल्या तीन एकर जागेत हे रुग्णालय बांधण्यात येणार होते. परंतु जिल्हा शल्यचिकीत्सकांनी यात खो घातला आणि त्यामुळे मार्चपर्यंत निधीचा उपयोग न केल्यामुळे हा सर्व निधी परत जाण्याची भीती आहे. केंद्रीय आयुष मंत्र्यांनी २०१९ मध्येच जिल्हा रुग्णालयास भेट देऊन आयुष विभागाची पाहणी करून समाधान व्यक्त केले होते. त्याकरिता निधीही प्राप्त झाल्याचे समजते. परंतु अजून कोणतीही हालचाल न केल्यामुळे हा निधी मार्चनंतर परत जाण्याची शक्यता आहे.