
ग्रामसेवकाने हडपली ग्रामस्थाची जमीन प्रजासत्ताकदिनी मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा दीपक फागे यांचा इशारा
खेड : खोटे दस्तावेज तयार करून खेड तालुक्यातील भरणे गावामध्ये जमीन हडप करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करण्यास शासकीय यंत्रणेकडून टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत भरणे येथील ग्रामस्थ दीपक फागे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. प्रजासत्ताक दिनी दीपक फागे हे मुंबई येथील मंत्रालयासमोर आमरण उपोषणला बसणार आहेत.
भरणे ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक अनिल दरडी यांनी खोटे दस्तावेज तयार करून आपली जमीन हडप केल्याचा आरोप करत भरणे येथील ग्रामस्थ दीपक फागे यांनी प्रशासनाकडे अनिल दरडी यांच्या विरोधात तक्रार केली होती. या तक्रारीची दाखल घेतली जावी यासाठी या आधी खेड तहसील कार्यालय तसेच रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी उपोषण देखील छेडले होते. या वेळी फागे यांना कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते पण प्रत्यक्षात मात्र काहीच कारवाई झाली नाही.
तत्कालीन ग्रामसेवक अनिल दरडी यांनी खोटे दस्तावेज बनवून शासनाची तसेच दिवाणी न्यायालयाची फसवणूक केल्याबाबतचा अहवाल तत्कालीन तहसीलदार, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी यांनी वरिष्ठ कार्यालयांना पाठवलेला आहे. परंतु असे असले तरी आजवर संबंधित ग्रामसेवकावर कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे भ्रष्ट शासकीय कर्मचाऱ्याला शासकीय यंत्रणाही वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.
संबंधित ग्रामसेवकावर तातडीने कारवाई व्हावी यासाठी आता दीपक फागे यांनी मंत्रालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा निर्णय घेतला असून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा निर्धार दीपक फागे यांनी केलेला आहे. प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी दीपक फागे हे मंत्रालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत.