
सावकारी धंदा करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
चिपळूण शहरात गेल्या काही वर्षापासून सुरू असलेला सावकारी धंदा आणि पठाणी वसुलीचा अखेर पर्दाफाश झाला असून एका महिलेला २० हजार रुपये वसूल करूनही पुन्हा तब्बल १ लाख २० हजार रुपयांच्या पठाणी वसुलीसाठी तगादा लावून तिला मारहाण करून अश्लिल शिवीगाळ आणि ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूणमध्ये सावकारी प्रकरणात हा पहिलाच गुन्हा दाखल झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
चिपळूण भेंडीनाका येथील बिलकीस अब्दुल करीम परकार या महिलेने चिपळूण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीमती परकार यांनी सावकारी करणारे शिवा खंडजोडे, चांगदेव खंडजोडे आणि पूजा मिरगल यांच्याकडून २० हजार रुपये कर्ज घेतले होते. त्या कर्जापोटी त्यांनी १५ हजार रुपये प्रथम अदा केले.
तसेच दंड म्हणून १० हजार रुपये देखील त्यांच्याकडून वसूल करण्यात आले. एकूण २५ हजार रुपये देवूनही त्यांच्यावर तब्बल १ लाख २० हार रुपयांची थकबाकी काढण्यात आली आणि वसुलीचा तगादा सुरू करण्यात आला, असे श्रीम. परकार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
चिपळूण पोलीस ठाण्यात ही फिर्याद दाखल करण्यात आल्यानुसार शिवा खंडजोडे, चांगदेव खंडजोडे, पूजा मिरगल या तिघांवर बेकायदा पैशाची वसुली करणे, जबरदस्ती करून मानसिक व शारिरीक त्रास देणे, मारहण व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तसेच सावकारी अधि. २०१४ चे कलम ४५ व ४८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूणमध्ये सावकारी प्रकरणात हा पहिलाच गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आता चौकशीचा ससेमिरा सुरू केला आहे. त्यामुळे काहींनी आपली कार्यालये बंद केली आहेत.
www.konkantoday.com