वाटद-मिरवणे येथील अवघड वळणावर अपघात; 15 वर्षीय मुलाचा मृत्यू
रत्नागिरी : वाटद- मिरवणे येथे अवघड वळणावर चारचाकी वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची घटना 21 जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यज्ञेश विजय निंबरे (21, रा. मिरवणे, आवडवाडी) हा आपल्या ताब्यातील चारचाकी घेऊन जयगडच्या दिशेने जात असताना वाटद गाव नदी मिरवणे येथील अवघड वळणावर त्याचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर गाडी विरुद्ध दिशेला जाऊन मोरीच्या कठड्याला जोरदार आदळली. या धडकेत यश संजय शिर्के (15, शिर्केवाडी) याचा जागीच मृत्यू झाला. तसेच दुर्वेश निंबरे व यश दिलीप बोचरे हे दोघेजण गंभीर जखमी झाले. याबाबतची फिर्याद सुधाकर शिर्के (वय 47) यांनी जयगड पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार वाहन चालक यज्ञेश निंबरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.