
मुंबई – गोवा महामार्गावर बोरज नजीक सेलोरो कारला अपघात कारमधील चार जण गंभीर जखमी ….
खेड : मुंबई गोवा महामार्गावरील बोरज गावच्या हद्दीत टोल नाक्यापासून काही अंतरावर मारुती सेलेरो आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला , या अपघातात कारमधील चौघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी लवेल येथील घरडा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार खेड येथून चिपळूणकडे भरधाव वेगाने जाणारी मारुती सेलेरो कार महामार्गावरील बोरज गावच्या हद्दीत असलेल्या टोलनाक्याजवळ आली असता चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि भरधाव वेगातील ती कार दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरवर जावून आदळली.
ही धडक इतकी जोरदार होती कि या धडकेत कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचुर झाला. अपघातानंतर कंटेनर चालकाचाही कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनरही महामार्गाच्या डाव्या बाजूला गटारात जाऊन दरडीला धडकला. ,
या अपघातात सेलेरो कार मधील यशवंत जयराम कदम वय ७१, राहणार चिपळूण, रंजना रमेश आंब्रे वय ५५ राहणार चिरणी ता. खेड, रमेश आंब्रे वय ६५ राहणार चिरणी ता. खेड , वेदांकी विनोद कदम राहणार पोफळी ता. चिपळूण हे चौघे गंभीर जखमी झाले, अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या अन्य वाहन चालकांनी व प्रवाशांनी जखमी प्रवाशांना लवेल येथील घरडा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. चौघांनाही गंभीर दुखापती झाल्या असून चौघांवरही उपचार सुरु आहेत.
दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातानंतर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
