कारवांचीवाडी-हातखंबापर्यंतचा रस्ता धोकादायक
रत्नागिरीतील कारवांचीवाडीपासून पाली व हातखंबा तिठा ते निवळी-बावनदी या दोन्ही मार्गांची खड्डे पडून अक्षरश: वाताहत झाली आहे. या खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना अपघात होउन अनेकदा जीवावर बेतण्याचे प्रसंग ओढवत आहेत. या मार्गाचे चौपदरीकरण रेंगाळलेले आहे. पण हे काम योग्य प्रकारे होईपर्यत तरी या मार्गांच्या दुरूस्तीसाठी लक्ष घालून हे रस्ते सुस्थितीत आणावेत, अन्यथा प्रशासनाला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शन रत्नागिरी तालुका यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरीला दिला आहे. कारवांचीवाडी ते पाली व हातखंबा तिठा ते निवळी बावनदी हे दोन्ही रस्ते खड्डे पडून अतिशय खराब बनले आहेत. अशा प्रकारच्या रस्त्यांमुळे अपघात होवून जीवितहानी, वाहनचालक जखमी होणे, वाहनांचे अतोनात नुकसान होणे, वाहनचालकांचे कधीही न भरून निघणारे मानसिक, शारीरिक तसेच आर्थिक नुकसान होत आहे.