मंडणगडवर महाविकास आघाडीची सत्ता?; दोन अपक्ष राष्ट्रवादीत, 9 जणांची गटस्थापना
मंडणगड नगरपंचायतीच्या सत्तेवर महाविकास आघाडीने शिक्कामोर्तब केले आहे. महाविकास आघाडीने शुक्रवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हांवर निवडून आलेले सात नगरसेवक व राष्ट्रवादीचे समर्थक दोन अपक्ष अशा 9 नगरसेवकांच्या उपस्थितीत गट स्थापन केला आहे. एकत्रित नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी या नावाचा गट स्थापन करण्यात आल्याने सत्तास्थापनेच्या उलट-सुलट चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांसह दोन अपक्षांचे समर्थन लाभले आहे.
रत्नागिरी येथे गट स्थापनेवेळी माजी आमदार संजय कदम, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले नगरसेवक सुभाष सापटे, वैभव कोकाटे, मुकेश तलार, प्रियांका लेंडे, मनिषा हातमकर, समृध्दी शिगवण, राजेश्री सापटे यांच्यासह अपक्ष नगरसेविका सोनल बेर्डे, रेश्मा मर्चंडे यांच्यासह माजी जि.प. सदस्य प्रकाश शिगवण, पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर, माजी नगरसेवक दिनेश लेंडे, लुकमान चिखलकर, हरेष मर्चंडे, दीनेश सापटे, सतिष दिवेकर आदी उपस्थित होते.
निवडणुकीची मतमोजणी 19 रोजी झाली. यात राष्ट्रवादी-शिवसेना महाआघाडीचे 7 उमेदवार, शहर विकास आघाडीचे 7 उमेदवार यासह 3 अपक्ष उमेदवार निवडून आले होते.
राष्ट्रवादीच्या गटस्थापनेमुळे सत्तेची समीकरणे स्पष्ट झाली आहेत. निवडणुकीत जबरदस्त आवाहन निर्माण करणाऱ्या शहर विकास आघाडीच्या सहा व त्यांचे दोन अपक्ष अशा आठ नगरसेवकांना विरोधकाच्या भूमिकेत बसावे लागणार आहे.
www.konkantoday.com