
पशूधन नोंदणीसाठी त्वरित पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधा
रत्नागिरी, दि. 13 : रत्नागिरी तालुक्यातील पशुपालकांच्या सर्व पशुधनाच्या ऑनलाईन नोंदी घेण्याकरिता पशुपालकांनी त्यांचे आधारकार्ड व आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल घेवून नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी त्वरित संपर्क साधावा व आपल्या सर्व पशुधनाची नोंदणी करून घ्यावी. असे आवाहन गट विकास अधिकारी, रत्नागिरी व पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती रत्नागिरी यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल लाइव्हस्टॉक मिशन (NDLM) अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वीत केली आहे. पशुधनाची सर्वकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी तसेच एखाद्या भागात उद्भवणारे आजार विचारात घेवून उपाययोजना करून त्यायोगे पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टिने राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रणालीमध्ये ईअर टॅगिंग ( 12 अंकी बार कोडेड ) केलेल्या सर्व पशुधनाच्या सर्वंकष नोंदी घेण्यात येत आहेत. त्यामध्ये जन्म-मृत्यु नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण यांचा समावेश आहे. नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन पशुधन तसेच मानवी आरोग्याच्या दृष्टिने एक महत्वाकांक्षी अभियान असल्याने ही प्रणाली राज्यांनी पूर्ण क्षमतेने वापरणे बंधनकारक आहे.पशुधनाच्या कानात Ear Tagging करून NDLM अंतर्गत भारत पशुधन प्रणालीवर पशुधनाचे लसीकरण, प्रजनन, उपचार आणि खरेदी-विक्री इ. सर्व नोंदी घेतल्यामुळे वास्तवकालीन माहिती साठा तयार होणार आहे. या माहितीकोषाच्या आधारे शेतकऱ्यांना, पशुपालकांना शासनाच्या सुविधा, योजना आणि पशुधनासाठी आवश्यक असलेल्या सेवांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे.पशुपालकांना पशुधनाची ईअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री करता येणार नाही. दिनांक 1 जुन नंतर ईअर टॅगिंग शिवाय पशुधनास पशुवैद्यकिय संस्था / दवाखान्यांमधून पशुवैद्यकिय सेवा देय होणार नाही. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुच्या हल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही. पशुधनाची वाहतुक ईअर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर नियमानूसार कारवाई करण्यात येईल. दिनांक 1 जुन पासून ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडा बाजार व गावागावातील खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यामुळे ईअर टॅग नसलेले पशुधन बाजारसमितीमध्ये आणले जाणार नाहीत व त्यांची खरेदी-विक्री होणार नाही. ग्रामपंचायतीमध्ये पशुंच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देतांना पशुधनाची ईअर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येवू नये. दाखल्यावर ईअर टॅगचा क्रमांक नमूद करण्यात यावा.www.konkantoday.com