
वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत नगरपरिषद हद्दीमधील जुन्या भाजी मार्केटच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन शहराच्या स्वच्छतेबाबत कॉम्प्रोमाईज नको – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी, दि. 18 : शहरामधील विकासकामे पूर्णत्वाकडे जातात. ती तशीच टिकली पाहिजेत. परिसराची, शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी ही सर्वांनी घेतली पाहिजे. त्यामध्ये कॉम्प्रोमाईज करुन उपयोगी नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत रत्नागिरी नगरपरिषद हद्दीमधील जुन्या भाजी मार्केट नुतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन कोनशिला अनावरण करुन आज झाले. पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, स्मार्ट सिटीमधून येथील तळ्याचे सुशोभिकरण देखील केले जाईल. 3 कोटी खर्च करुन भाजी मार्केटची इमारत होणार आहे. त्याची निगा राखणे, काळजी घेणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आता जे व्यापारी आहेत त्यांचे पुनर्वसन नव्या इमारतीत करु. दर्जेदार कामे करुन घेतली तर तक्रार होणार नाही. शहर सुंदर देखणे बनविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करु.
अंमली पदार्थामुळे भावी पिढी बरबाद होणार आहे. अंमली पदार्थ सेवन दूर केले पाहिजे. त्यासाठी विक्रेत्यांवर कारवाई झाली पाहिजे. अशा विक्रेत्यांची माहिती पोलीसांना द्यावी. ही प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे. पालकांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा. पुढच्या नव्वद दिवसात जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करु. त्यासाठी उच्चाटन करण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सामंत यांनी केले.
तळमजला, गोदाम, पार्कींग, स्वच्छतागृह, 17 गाळे, पहिल्या मजल्यावर बहुउद्देशीय सभागृह, भोजनालय, गोदाम, स्वच्छतागृह अशी या नव्या इमारतीत तरतूद करण्यात आली आहे.
माजी नगरसेवक किशोर मोरे यांनीही मार्गदर्शन केले. वैभवी खेडेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला मुख्याधिकारी तुषार बाबर, राहूल पंडीत, बिपीन बंदरकर, विकास पाटील, संजय नाईक, सतीश मोरे, बंड्या साळवी, राजन शेट्ये, सुदेश मयेकर, मुसाभाई काझी आदींसह नागरिक उपस्थित होते.000