मॅनेजमेंट गुरू, मार्गदर्शक डॉ. सुभाष देव यांचे निधन
माजी आमदार बाळ माने यांनी वाहिली श्रद्धांजली
रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष देव यांचे गोवा येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रत्नागिरीच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे. डॉक्टर देव यांचे अचानक झालेले निधन धक्कादायक आहे, हे दुःख पचवण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना देवो, अशी प्रतिक्रिया माजी आमदार बाळ माने यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले की, दोनच दिवसापूर्वी माझा वाढदिवस झाला त्यापूर्वी डॉक्टर देव सरांशी बोलणे झाले होते. त्यांनी माझ्या शैक्षणिक योगदानासंदर्भात आणि दि यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेज, प्राथमिक, माध्यमिक शाळेसंदर्भात लेख लिहून दिला होता. तो वृत्तपत्रात प्रसिद्धही झाला.
डॉक्टर देव यांच्या निधनामुळे रत्नागिरीकरांवर शोककळा पसरली आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, गोगटे महाविद्यालय, भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय, कॉमर्स विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग अशा सर्वच ठिकाणी डॉक्टर देव यांनी भरीव योगदान दिले आहे.
बाळ माने म्हणाले, त्यांचे मला नेहमीच मार्गदर्शन लाभत होते. माझ्या आमदारकीच्या कालावधीमध्ये तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कारकिर्दीसाठी डॉक्टर देव यांचे आशीर्वाद मला लाभले होते. मी त्यांचा विद्यार्थी होतो. त्यांच्या निधनामुळे आमचे गुरु मार्गदर्शक गेल्याचे दुःख खूप आहे.
महाविद्यालयामध्ये गरीब गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत तसेच प्राध्यापकांना अद्ययावत ज्ञान मिळण्याकरिता त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही माने कुटुंबिय सहभागी आहोत, असे बाळ माने म्हणाले.
*