पुन्हा एकदा…. वाचन वसा!
गेल्यावर्षी म्हणजे 2020 मध्ये कोरोनामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम होत नसल्यामुळे सगळ्याच संस्था सोशल मीडियावर उपक्रम सादर करत होत्या. आपण, आर्ट सर्कल म्हणूनसुद्धा ऑनलाईन कार्यक्रमात सातत्य राखण्याचा प्रयत्न करत होतो. 2 मे 2020 पासून बीज अंकुरे, कलंदर, ध्यासपंथी, अष्टप्रहर सारख्या मालिकांमधून विविध व्यक्तिमत्वे आपण समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला. ह्यातला प्रत्येक उपक्रम यशस्वी झालाच पण संस्थेला सगळ्यात जास्त रसिकाश्रय मिळवून दिला तो वाचन वसा ह्या अभिनव उपक्रमाने! मराठी अधिक महिन्याचे औचित्य साधून दररोज एका पुस्तकाचे अभिवाचन आणि त्या लेखकांशी संवाद असा हा उपक्रम होता. ह्यामधून 33 पुस्तकं आणि 33 लेखकांशी संवाद साधता आला. त्यानंतरही वाचन वसा सुरू ठेवण्याबाबत रसिकांकडून विचारणा होत होती पण योग काही जुळून येत नव्हता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले आणि त्यात प्रणव सखदेव यांना युवा पुरस्कार मिळाल्याचे कळले. वाचन वसा दरम्यान ज्या 33 लेखकांशी परिचय झाला होता त्यातलाच एक प्रणव! आजच्या पिढीतला लेखक, अनुवादक आणि संपादकही! त्याच्या ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ ला मिळालेल्या पुरस्काराचे औचित्य साधून पुन्हा एकदा वाचन वसा सुरू करण्याचा प्रयत्न करण्याचे ठरले. मात्र पुरस्कारप्राप्त पुस्तक वाचण्याऐवजी त्याचं नाशिक साहित्य संमेलनादरम्यान आलेलं नवीन पुस्तक वाचतोय. लेखक तर आता संस्थेचाच हक्काचा सभासद असण्याइतपत ओळखीचा झाला असल्यामुळे आणि प्रकाशक रोहन प्रकाशनने सुद्धा लगेच होकार दिल्यामुळे दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट ह्या नवीन पुस्तकाचे अभिवाचन करता आले.
पण त्यापेक्षा महत्वाची आणि आनंदाची गोष्ट नंतर घडली. अभिवाचन तयार झाल्यावर रोहन प्रकाशनची दुसरी हक्काची लेखिका,अनुवादिका व संपादक असलेली नीता कुलकर्णी हिने पुढाकार घेतला आणि या पुस्तकाचे नुसतेच अभिवाचन करण्यापेक्षा इ-प्रकाशन करण्याची कल्पना सुचवली. प्रणवशी आणि रोहन प्रकाशनाचे प्रमुख प्रदीप चंपानेरकर यांच्याशी झालेल्या चर्चेतून या ऑनलाइन कार्यक्रमासाठी – ज्येष्ठ साहित्यिक श्री. वसंत आबाजी डहाके यांना अध्यक्ष म्हणून निमंत्रित केलं. डहाके सरांनीही होकार दिला ही संस्थेसाठी सुद्धा खूप महत्वाची बाब आहे.
अशा रीतीने, दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आर्ट सर्कल, रत्नागिरीच्या फेसबुक पेजवरुन व युट्युब चॅनेलवरून सादर होणार आहे. शनिवार दिनांक 8 जानेवारी 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता होणाऱ्या प्रकाशन सोहळ्यास, त्यानंतर अभिजित शेलार व दीप्ती कानविंदे यांनी केलेल्या अभिवाचनास आपण जरूर उपस्थित राहावे ही विनंती.
वाचन वसाच्या दुसऱ्या भागास आपणासारख्या साहित्यप्रेमींचे आशीर्वाद मिळावेत ही सदिच्छा!
-आर्ट सर्कल रत्नागिरी.
www.konkantoday.com