
चिपळूणवासियांचा लढा यशस्वी, साखळी उपोषण स्थगित
चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून चिपळूणवासियांनी ताकद दाखविली. शासनावर दबाव निर्माण झाला, त्यामुळे नागपूर, अमरावतीसह महाराष्ट्राच्या विविध भागातून वाशिष्ठीचा गाळ काढण्याची यंत्रणा या ठिकाणी पोहोचली आहे. नाम फाऊंडेशनला इंधनासाठी शासनाकडून निधी दिला जाईल व शिवनदीचा गाळ काढला जाईल. समितीच्या बारा मागण्यांपैकी ९ मागण्या मान्य झाल्याचे लेखी पत्र आता देत आहे. तीन मागण्यांच्या पूर्ततेबाबत प्रक्रिया सुरू आहे. गाळ काढण्याचे काम सुरू आहे. आता समितीबरोबर आपली नदी स्वच्छ करून घेण्याचे व भविष्यात ती स्वच्छ ठेवण्याची ही इथल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याच्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी केले.
पूररेषा रद्द करावी, या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू होते. या अधिवेशनाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. अधिवेेशनातही हा विषय चर्चेला आला. अखेर जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी काल दुपारी चिपळूणध्ये येऊन मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र दिले. तेव्हा समितीने साखळी उपोषण २९ व्या दिवशी स्थगित करीत असल्याचे जाहीर केले. www.konkantoday.com