
मिशन सागर अंतर्गत पोलिसांनी केला भाट्ये किनारा स्वच्छ
रत्नागिरी: पोलीस म्हटलं की, खाकी वर्दीतील कायद्याचे रक्षक म्हणून त्याची ओळख. वाद-विवाद सोडविण्यासाठी नेहमीच पुढे, बंदोबस्त, गुन्ह्यांचा तपास हे त्यांचे मुख्य काम. हातात लाठी घेऊन बंदोबस्तासाठी उभे असलेले पोलीस कर्मचारी, अधिकारी आपण नेहमीच पाहतो, परंतु रविवारी पोलिसांच्या हाती लाठी ऐवजी झाडू होता. पर्यावरण रक्षणासाठी रत्नागिरी पोलिसांनी भाट्ये समुद्रकिनारा स्वच्छ करून वेगळा आदर्श सर्वांसमोर निर्माण केला आहे. मिशन सागर अंतर्गत रत्नागिरी पोलीस दलाकडून हा उपक्रम राबविण्यात आला.
रविवारी भाटये येथे सागर मिशन अंतर्गत सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत ही स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. रत्नागिरीत पर्यटक फिरायला येतात, तेव्हा त्या पर्यटकांना समुद्रकिनारे हे स्वच्छ दिसावेत म्हणून तरी नागरिकांनी सुद्धा समुद्रावर जाताना कचरा दिसला तर तो उचलून कचरा कुंडीत टाकावा असे आवाहन देखील पोलिसांनी नागरिकांना केले आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक रूषीकेश रेड्डी,राखीव पोलीस निरीक्षक रमेश निकम, राखीव पोलीस उपनिरीक्षक सुभाष तारये,पोलीस कवायत निर्देशक अजित कीर,गिरीष सार्दळ, पूजा पाटील उपस्थित होते, १०१ नवप्रविष्ठ अंमलदार, दंगा काबु पथकाचे १८ अंमलदार , शीघ्र कृती दलाचे ०६ अंमलदार यांनी ह्या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता.
३० जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असल्यामुळे पोलिसांकडून ही स्वच्छता राबवण्यात आली. महात्मा गांधी यांना स्वच्छता प्रिय असल्यामुळे आपण आपला परिसर देखील स्वच्छ ठेवला पाहिजे असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी यावेळी पोलीस अंमलदार यांना सांगितले.